ट्रम्प यांच्या योजनेत भारताचा समावेश?
पाच देशांचा नवा गट स्थापन करण्याच्या हालचाली
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही मोठ्या देशांचा एक नवा आंतरराष्ट्रीय गट निर्माण करण्याची योजना केली आहे, असा संकेत मिळत आहे. या गटात भारताचाही समावेश करण्याची त्यांची इच्छा आहे, अशी माहिती सूत्रांकडून दिली गेल्याने या नव्या संभाव्य गटासंबंधी जगात कुतुहल निर्माण झाले आहे. या गटात अमेरिका, रशिया, चीन, भारत आणि जपान या देशांचा समावेश केला जाणार आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात तीव्रपणे केली जात आहे. या पाच देशांच्या संभाव्य गटाला ‘हार्ड पॉवर’ असे संबोधन प्राप्त झाले आहे.
असा गट निर्माण करून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना युरोपचे वर्चस्व कमी करायचे आहे, असे बोलले जात आहे. काही तज्ञांच्या मते असा गट निर्माण होण्याची शक्यता दुरापास्त आहे. तथापि, अमेरिकेने पुढाकार घेतल्यास आणि असा गट स्थापन झाल्यास आश्चर्य वाटण्याचेही कारण नाही, असे या तज्ञांचे म्हणणे आहे.
सध्या असे गट कार्यरत
सध्या जगात असे अनेक देशांचे आर्थिक आणि सामरिक गट कार्यरत आहेत. जी-7, जी-20 आदी गट त्यांच्यात प्रमुख आहेत. तथापि, या गटांवर युरोपचे वर्चस्व आहे. ट्रम्प यांना हे वर्चस्व नको असून त्यांना या नव्या संभाव्य गटाच्या माध्यमातून जगाच्या अर्थकारणाला आणि राजकारणाला नवी दिशा द्यायची आहे. मात्र, असा गट खरोखरच स्थापन झाल्यास तो युरोपियन देशांसाठी मोठा धक्का असेल. त्यांचा या गटाला विरोध असेल, अशी भावनाही अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या यासंबंधी केवळ चर्चा केली जात असून प्रत्यक्षात पावले उचलली जातील, तेव्हाच खरे चित्र स्पष्टपणे दिसू लागेल, अशी सध्या स्थिती आहे.
अद्याप नाही अधिकृत माहिती
असा पाच देशांचा गट स्थापन केला जाणार आहे, अशा प्रकारचे जाहीर विधान अद्याप अमेरिका किंवा अन्य कोणत्याही देशाकडून करण्यात आलेले नाही. अशा प्रकारची कोणती योजना आकाराला येत आहे, किंवा तशी कागपदत्रे सज्ज करण्यात येत आहेत, आदी संबंधीच्या वृत्तांचा इन्कार व्हाईट हाऊसकडून करण्यात आला आहे. तथापि, अमेरिकेतील एक प्रसिद्ध वृत्तसंस्थेने यासंबंधी विश्वासार्ह सूत्रांच्या साहाय्याने माहिती प्रकाशित केली आहे. या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, ही योजना अमेरिकेच्या एका अप्रकाशित कागपदत्रात मांडण्यात आली होती, ज्या कागदपत्राचे प्रकाशन गेल्या आठवड्यात ‘व्हाईट हाऊस’कडून केले गेले होते.
जगातील मोठा गट ठरणार
या संभाव्य गटातील संभाव्य देशांपैकी बहुतेकांची लोकसंख्या 10 कोटीहून अधिक आहे. असा गट स्थापन करुन त्याची जी-7 गटाप्रमाणे प्रत्येक वर्षी शिखर परिषद आयोजित करण्याची योजना आहे. या परिषदेत विविध जागतिक आणि भू-राजकीय विषयांवर चर्चा केली जाईल. या प्रस्तावित गटासमोरचा प्रथम विषय मध्यपूर्वेतील सुरक्षा, तसेच इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यात संबंधाचे सामान्यीकरण हा असेल, इथपर्यंत माहिती सूत्रांच्या आधारे दिली गेली आहे.
‘व्हाईट हाऊस’कडून इन्कार
अशा गट स्थापन होण्याची कोणतीही संभाव्यता ‘व्हाईट हाऊस’कडून नाकारण्यात आली आहे. तरीही ही चर्चा होत आहे. ट्रम्प यांनी विश्वव्यवस्था पूर्णपणे परिवर्तीत करण्याचा ध्यास घेतला आहे. याला ‘ट्रम्पवाद’ असे संबोधले जात आहे. सध्याच्या जी-7 किंवा जी-20 आदी व्यवस्था झपाट्याने परिवर्तीत होणाऱ्या जगाच्या व्यवस्थापन करण्यास अपुऱ्या आहेत, असे ‘ट्रम्पवादा’चे तत्व आहे. त्यामुळे अशा गटाच्या स्थापनेची चर्चा औपचारिक नकारानंतरही केली जात आहे. मोठ्या लोकसंख्येच्या आणि सेनासामर्थ्य असणाऱ्या देशांना एकत्र आणण्याचे ट्रम्प यांचे धोरण असल्याचे प्रतिपादन अनेक जागतिक अभ्यासकांकडून करण्यात आले आहे.
