अमेरिकेच्या विस्तारवादात कॅनडाचा पहिला बळी?
चीन विस्तारवादी धोरण अवलंबत असल्याचा ठपका ठेऊन त्या विरोधात इशारे देणाऱ्या अमेरिकेनेच आता साम्राज्यवादाचा अंगिकार केल्याचे दिसत आहे. कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टीन ट्रुडो यांना रात्र भोजनावेळी आपला 51 वा राज्यपाल नियुक्त करत असल्याचे वक्तव्य करून डोनाल्ड ट्रम्प यांनी धमाल उडवून दिली. तर मेक्सिकोला 300 अब्ज डॉलर्सची सवलत देण्यापेक्षा ते 52 वे राज्य व्हावे अशी इच्छा अमेरिकेच्या नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांनी केली आहे. त्यापुढे जात अलास्काप्रमाणेच डेन्मार्कच्या ताब्यात असलेले ग्रीनलँड बेट खरेदी करण्याचा इरादा ट्रम्प यांनी बोलून दाखविलेला आहे.
कॅनडा आणि मेक्सिकोला दरवर्षी अनुक्रमे 100 अब्ज व 300 अब्ज डॉलर्सची सवलत अमेरिकेकडून दिली जाते. त्याबदल्यात अमेरिकेला सोसावी लागते घुसखोरांची समस्या. या दोन्ही देशांकडून अमेरिकेत बेकायदा घुसणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यावर अमेरिकन नागरिकांच्या करातून येणारा निधी वायफळ खर्च करावा लागत असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे. यासाठी आता हे दोन्ही देश अमेरिकेची दोन राज्ये बनल्यास त्यांच्यावर खर्च करण्यास अमेरिकन सदैव तत्पर असल्याचा युक्तिवाद डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचार काळात या मुद्द्यावर भरपूर चर्चा चर्वण केलेली असल्याने दोन्ही देश चवताळलेले आहेत.
अमेरिका हा 50 राज्यांचा संघराज्य असून प्रत्येक राज्यात राज्यपाल नियुक्त केलेले आहेत. दीडशे वर्षांपूर्वी अस्तित्वात येत असताना एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ, या न्यायाने एकत्र आली. पुढे काही राज्ये शक्तीच्या जोरावर अमेरिकेच्या संघप्रदेशात सामावून घेण्यात आली. तर अलास्कासारखे कॅनडाच्या पलीकडे असलेले राज्य खरेदी केले होते. त्यासाठीच आता नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यात कॅनडा आणि मेक्सिकोची भर घालण्याची धमकी देत आहेत. तसे जमत नसेल तर कॅनडा आणि मेक्सिकोतून येणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के कर लादण्याचा विचार करणार असल्याचे भावी राष्ट्राध्यक्षांनी बोलून दाखविले आहे. अमेरिकेचे हे शेजारी देश सार्वभौमत्व असतानाही डोनाल्ड ट्रम्प अशाप्रकारे बोलत असल्याने कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टीन ट्रुडो यांचा फालूदा झालेला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर मेक्सिकोकडून विशेष काही प्रतिक्रिया आलेली नाही. पणकॅनडामधून बराच प्रतिकार होताना दिसत आहे. ओंटारिओ या कॅनडाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्याचे प्रधानमंत्री डग फोर्ड यांनी अमेरिकेला पुरविण्यात येणारी वीज बंद करण्याची धमकी दिलेली आहे. अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर असलेल्या ग्रेट अमेरिकन तलावावर उभारलेल्या जलविद्युत प्रकल्पातून निर्माण होणारी वीज अमेरिकेला दिली जाते. वीज पुरवठा बंद झाल्यास साधारणत: पंधरा लाख अमेरिकन नागरिकांना त्याचा फटका बसणार आहे. त्याच प्रमाणे कॅनडामधून पेट्रोलियम पदार्थांची होणारी निर्यातही बंद करण्याचा इशारा दिलेला आहे. डग फोड यांच्या या धमकीला अर्थातच अमेरिका वा ट्रम्पकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आता तिसरे नवीन राज्य शोधले असून कॅनडाच्या पूर्वेला असलेल्या ग्रीनलँडवर ट्रम्पची नजर गेलेली आहे. ग्रीनलँडवर इलेक्ट्रिक बॅटरीसाठी लागणारी खनिजे विपुल प्रमाणात असून एलॉन मस्क यांच्या टेस्लाच्या सोयीसाठी नाटोच्या संस्थापक सदस्याबरोबर दोन हात करण्यास ट्रम्प तयार झालेले आहेत. जगातील मोठ्या बेटावर अर्थात ग्रीनलँडवर डेन्मार्कचा ताबा असून ते हिसकावून घेण्यासाठी डेन्मार्कमध्ये राजदूत म्हणून केन होवेरी यांची नियुक्ती करण्याचा इरादा ट्रम्प यांनी जाहीर केलेला आहे. यापूर्वीच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी नाटोमधून बाहेर पडण्याची तयारी केली होती. आता या अशा धोरणामधून नाटोमध्ये आता घमासान सुरु होणार आहे.
कॅनडा, मेक्सिको, ग्रीनलँड यांच्यावर दावा करताना आता पनामा कालव्यावर नजर ठेऊन आहे. पनामा कालवा अमेरिका आणि युरोपसाठी फायदेशीर ठरलेला आहे. या कालव्यामुळे अमेरिकेच्या जहाजांना अटलांटिक समुद्रातून प्रशांत महासागरात जाण्यासाठी 11 हजार किलोमीटरचा वळसा घालून जावे लागायचे. यावर उपाय म्हणून एकोणिसाव्या शतकात पनामा कालवा उभारण्याचे निश्चित झाले. त्याकाळी पनामा प्रांत कोलंबियाच्या वर्चस्वाखाली होता. पुढे अमेरिकेने 1903 साली पनामा प्रांताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यानंतर कालवा बांधण्याचे ठिकाण अमेरिकेने आपल्या ताब्यात घेऊन पनामा कालवा प्रकल्प पूर्ण केला. हा कालवा उच्च तंत्रज्ञानाने युक्त असून अटलांटिक समुद्राची पातळी प्रशांत महासागराच्या तुलनेने कमी आहे. हा कालवा 1999 पर्यंत अमेरिकेच्या ताब्यात होता. आता तो पनामा सरकारच्या ताब्यात असून त्यावर डोनाल्ड ट्रम्पची नजर गेलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर निवड झाल्यापासून ते बेताल वक्तव्ये करण्यास मोकळे झालेले आहेत. त्यांचे हे मनसुबे की मनातील बुडबुडे हे 2028 पर्यंत सिद्ध होईल. मात्र या काळात त्यांच्या मित्रराष्ट्रांना ट्रम्प यांचे विनोद सहन करावे लागणार आहेत.
-प्रशांत कामत