‘तिसऱ्या जगा’साठी अमेरिकेची दारे बंद?
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
‘तिसऱ्या जगा’तील लोकांसाठी अमेरिकेचे दरवाजे कायमचे बंद करण्याची माझी योजना आहे, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे जगात मोठी खळबळ उडाली असून ‘तिसरे जग’ म्हणजे ट्रम्प यांना नेमके काय अभिप्रेत आहे, यावर बरीच चर्चा होत आहे. ट्रम्प यांनी हे विधान करताना यासंबंधी कोणतेही स्पष्टीकरण न केल्याने गोंधळात भरच पडली आहे.
अमेरिकेत मूळच्या अफगाणिस्तानच्या असलेल्या एका व्यक्तीने व्हाईट हाऊस नजीकच्या परिसरात दोन सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या गोळीबारात हे दोन्ही सुरक्षा रक्षक जखमी झाले होते. त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रम्प अत्यंत संतापले आहेत. त्यामुळे तिसऱ्या जगातील लोकांना अमेरिकेत प्रवेश करता येणार नाही, अशी व्यवस्था करण्याची भाषा त्यांनी केली आहे. पण तिसरे जग याची नेमकी व्याख्या अमेरिकेच्या स्थलांतर नियमांमध्ये करण्यात आली असल्याने चित्र नंतर स्पष्ट होईल, अशी अनेकांची भावना आहे.
तिसरे जग म्हणजे काय...
ही संज्ञा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या शीतयुद्धाच्या काळात उपयोगात होती. अमेरिका, युरोपातील नाटो सदस्य देश आणि ऑस्ट्रेलिया यांना प्रथम जग असे संबोधले जात होते. त्यानंतर रशिया, वॉर्सा करार देश, चीन आणि इतर कम्युनिस्ट देश यांना दुसरे जग असे मानण्यात येत होते. तर जे देश अमेरिका आणि रशिया यांच्यापैकी कोणाच्याही गटात नव्हते त्यांना आणि इतर निर्धन देशांना तिसरे जग असे संबोधण्यात येत होते. तिसऱ्या जगात भारताचाही समावेश केला गेला होता.
संज्ञांमध्ये परिवर्तन
या संज्ञांमध्ये आता परिवर्तन झाले आहे. तिसऱ्या जगातील अनेक देशांनी चांगली आर्थिक प्रगती केल्याने त्यांना ‘विकसनशील देश’ असे आता संबोधण्यात येते. भारताचा समावेश विकसनशील देशांमध्ये आता केला जातो. त्यामुळे ट्रम्प यांनी तिसरे जग म्हणजे नेमक्या कोणत्या देशांचा उल्लेख केला आहे, हे त्यांनीच स्पष्ट केल्याशिवाय यासंबंधीची चर्चा थांबणार नाही, असे तज्ञांचे मत आहे.
भारतावर काय परिणाम...
तिसऱ्या जगात आता भारताचा समावेश होत नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेने दुसऱ्या जगात असलेल्या जपानलाही अर्थव्यवस्थेच्या आकारात मागे टाकले आहे. त्यामुळे आता तो तिसऱ्या जगाच्या श्रेणीतून बाहेर पडला आहे. पण ट्रम्प यांच्या दृष्टीने तिसरे जग म्हणजे काय, हे नेमकेपणाने स्पष्ट झाल्याशिवाय भारताचा समावेश ते तिसऱ्या जगात करतात की नाही, हे समजणार नाही. म्हणून सध्या तरी भारतावर ट्रम्प यांच्या घोषणेचा नेमका काय परिणाम होईल, हे स्पष्ट होत नाही. म्हणून काहीकाळ प्रतीक्षा करणे योग्य ठरेल, असे अनेकांचे म्हणणे आहे.