‘एआय’ शाप की वरदान?
उशिरा का असेना परंतु केंद्र सरकारला जाग आली आहे. गंगा-यमुना नदीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि आता केंद्र सरकारने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजे ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा जो गैरवापर केला जात आहे त्या अनुषंगाने काहीतरी कठोर पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तयार झाल्यानंतर माहिती युगामध्ये बरीच मोठी क्रांती झालेली आहे. प्रत्येक क्षेत्रात या तंत्राचा वापर करून अनेक कामे अल्पावधीत केली जात आहेत. त्याचबरोबर जिथे मनुष्यबळ कमी पडते त्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यशस्वी होत असल्याचे आढळून येते. परंतु जेवढी यंत्रणा चांगली तेवढीच ती धोकादायकदेखील ठरत आहे. कोणत्याही यंत्रणेचा दुऊपयोग हा अत्यंत हानिकारक असतो. आपण वातानुकूलित यंत्रणेचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहोत, त्याचे दुष्परिणाम हवामानामध्ये आपल्याला आढळून येतात. पृथ्वीवरील ओझोनचे प्रमाण कमी होत असल्याने तापमानामध्ये वाढ दिसून येतेच, शिवाय भौगोलिकदृष्ट्या ज्या अनपेक्षित घटना आपण पाहतो त्यांचे प्रमाणही वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा प्रकार माणसासाठी वरदान की शाप! याविषयी बराच उहापोह झालेला आहे. ‘एआय’ घातक म्हणणाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे, मात्र ही अत्याधुनिक यंत्रणा स्वीकारण्यासाठी अनेक हात पुढे आलेले आहेत. त्यातून एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे अनेक कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्याकडील अनेक कर्मचाऱ्यांना घरी पाठविले आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दहा किंवा पन्नास कर्मचारी जे काम करतात, ते काम कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे अवघ्या काही तासांमध्ये होऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जेवढा होतो त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात गैरवापर सध्या केवळ भारतातच नव्हे, इतरही राष्ट्रांमध्ये होऊ लागला आहे. एका राष्ट्राने कृत्रिम बुद्धिमत्तेवर बंदी घालावी यासंदर्भातील ठरावही संसदेत संमत केला. प्रत्यक्षात त्या राष्ट्राने त्याची अंमलबजावणी केली की नाही, हा विषय गौण आहे. जग पुढे धावत आहे आणि आपल्यालाही मागे राहता येणार नाही, पुढे जावेच लागेल. कृत्रिम बुद्धिमत्ता हा प्रकार किंवा ही यंत्रणा हे आपल्यासाठी फार मोठे वरदान आहे, परंतु अलीकडे समाजमाध्यमांतून ज्या प्रकारे त्याचा वापर होतोय ते पाहता ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा शाप ठरत आहे. चक्क वृत्तवाहिन्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे कृत्रिम माणसे तयार करून हुबेहूब दिसणाऱ्या माणसांप्रमाणे बातम्या वाचून दाखवतात. कोणाला कळणार देखील नाही की हा माणूस खरा नाही. अनेक राजकीय नेत्यांचे भलत्याच महिलांशी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये नाते जोडल्याचे दाखविले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा एवढ्या प्रमाणात गैरवापर होत आहे की त्यातून अनेक घरांमध्ये भांडण तंटे निर्माण झाले. जे खरे नाही, ते खरे असल्यासारखे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. एखाद्या व्यक्तीच्या आवाजाची नक्कल करून त्याचे फोटो घेऊन त्या आधारे त्या व्यक्तीचे भाषण तयार करून वाटेल ती निवेदने त्यांच्या तोंडी घातली जात आहेत. त्यातून अनेकजण फसले जात आहेत. आता बिहारची निवडणूक चालू आहे, बिहारमध्ये देखील ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर करून अनेक प्रकारचे व्हिडिओ तयार करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. निवडणूक आयोगाने या संदर्भात कडक कारवाई करू, असा इशारा दिलेला आहे. समाज माध्यमांमध्ये सध्या बनावटगिरी फार वाढलेली आहे. ‘एआय’चा वापर हा जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केला जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे वरदान आहे, परंतु त्याचा नको त्या ठिकाणी नको त्या प्रकारे वापर करून मोठे गैरसमज, संभ्रम, अस्थिरता समाजामध्ये निर्माण करण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न चालू आहे, त्या विरोधात केंद्र सरकारने आता काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. ही कठोर पावले उचलल्यानंतर माहिती व प्र्रसारण मंत्रालयाने माहिती व तंत्रज्ञानाच्या नियमांमध्ये काही बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे मूळ माहिती व सिंथेटिक पद्धतीची सामग्री या वेगवेगळ्या केल्या जातील आणि समाज माध्यमातून खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न तिथेच रोखला जाईल. त्याचबरोबर 50 लाखाहून अधिक वापरकर्ते असलेल्या मोठ्या समाजमाध्यम संस्थांना त्यांच्याकडे अपलोड होणारी माहिती खरी आहे की खोटी? की सिंथेटिक पद्धतीची आहे? याबाबत माहिती घ्यावी लागेल. सिंथेटिक पद्धतीच्या माहितीवर तशा आशयाचे लेबल लावणे सक्तीचे केले जाणार आहे. हे लेबल स्पष्ट दिसणारे असायला हवे. त्यामुळे एखादा व्हिडिओ चित्रित केलेला असेल तर तो खरा आहे की कृत्रिम पद्धतीचा आहे, हे तो प्रसारित करताना त्यातील दहा टक्के भाग कृत्रिम आहे, हे दाखविणे बंधनकारक केले जाणार आहे. थोड्या उशिरा ही पावले उचलली जात आहेत, परंतु ती योग्य दिशेने पडली आहेत. अनेक दंगली कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापरातून झालेल्या आहेत. अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. अनेकांचे संसार देखील गैरसमजातून उद्ध्वस्त झालेले आहेत. हे प्रकार एवढे गंभीर आहेत, की यावर जर आळा बसला नाही तर सारे जग हे बनावटच होऊन जाईल. त्यातून खरे कोणते, खोटे कोणते? हे कळण्यास मार्ग राहणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे चांगल्या तंत्रज्ञानाचा गैरवापर होतोय ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. खोटी माहिती देणे, फसवणूक करणे, कोणाचे संबंध कोणाशीही जोडणे व जे शक्यच नाही ते शक्य असल्याचे चित्रीकरणद्वारे दाखविले जाते, या सर्वांचा परिपाक अत्यंत घातक बनत आहे. आजही जनतेमध्ये किंवा हुशार मंडळींमध्ये जी चर्चा होते त्यात त्याचे उत्तर सापडत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता हे वरदान की शाप! कोणतीही यंत्रणा वाईट नसते, घातकही नसते. तिचा गैरवापर आणि नको तेवढा वापर घातक ठरत असतो. म्हणूनच आपल्याला याबाबत सातत्याने सतर्क राहणे आवश्यक आहे. सध्याची कृत्रिम बुद्धिमत्ता मर्यादित आहे, त्यामध्ये आणखी संशोधन होऊन ही यंत्रणा आपल्या घरात किचनपर्यंतदेखील पोहोचेल आणि त्यातून पुढे त्याचे दुष्परिणाम प्रत्येकाला भोगावे लागतील. म्हणूनच केंद्र सरकारने जे काही पाऊल उचलले आहे, त्या अनुषंगाने काही नियम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचे खरे तर स्वागतच झाले पाहिजे. यंत्रणा चांगली असली म्हणून होत नाही, त्यावर कोणाचे तरी नियंत्रण आवश्यक असते, नाहीतर सर्व ठिकाणी बेबंदशाही होऊन बसेल.