सामाजिक वनीकरणतर्फे रोपांना जलसिंचन
बेळगाव : सामाजिक वनीकरणामार्फत विविध ठिकाणी लावलेल्या रोपांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. खात्यामार्फत पावसाळ्यात तालुक्यातील विविध भागात 30 हजारहून अधिक रोपे लावण्यात आली आहेत. या रोपांना आता टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर जानेवारीपासून रोपांना पाणी दिले जाते. सामाजिक वनीकरण विभागामार्फत पावसाळ्यात 30 हजार रोप लागवड करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सरकारी शाळा, खुल्या जागा, स्मशानभूमी आदी ठिकाणी ही लागवड केली आहे. साग, पिंपळ, वड, जांभूळ, लिंबू, कडीपत्ता आदी रोपांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, आता या रोपांना पाण्याची गरज भासू लागली आहे. त्यानुसार रोपांना पाणी दिले जात आहे. पर्यावरण संवर्धन व्हावे आणि वृक्षसंख्येत वाढ व्हावी यासाठी विविध ठिकाणी रोप लागवडीवर भर दिला जात आहे. खात्यामार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते. त्याबरोबरच संवर्धनासाठी पाणी घातले जात आहे. त्यामुळे साहजिकच वृक्षसंवर्धन होऊन झाडांच्या संख्येत भर पडली आहे. तालुक्यातील संपर्क रस्त्यांवरही वृक्षलागवड करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध रस्ते हिरवाईने फुलू लागले आहेत.
टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा
10 ते 15 ग्रा.पं. हद्दींमधील रोपांना पाणी दिले जात आहे. सुळेभावी, मास्तमर्डी, बिजगर्णी, तारिहाळ, मुत्नाळ, अगसगा, संतिबस्तवाड, बंबरगे, हलगीमर्डी, हिरेबागेवाडी आदी गावांमध्ये लागवड केलेल्या रोपांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
- गिरीश इटगी, सामाजिक वनीकरण अधिकारी