आयर्लंडचा पहिला कसोटी विजय,
अफगाणवर सहा गड्यांनी मात, मार्क अडेर सामनावीर
वृत्तसंस्था/ टॉलरन्स, ओव्हल
आयर्लंडने शुक्रवारी येथे खेळाच्या तिसऱ्याच दिवशी एकमेव कसोटी सामन्यात अफगाणचा सहा गड्यांनी पराभव केला. या सामन्यात आयर्लंडच्या मार्क अडेरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. आयर्लंडचा कसोटीमधील हा पहिला विजय आहे.
या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणचा पहिला डाव 155 धावावर आटोपला. त्यानंतर आयर्लंडने पहिल्या डावात 263 धावा जमवत अफगाणवर 108 धावांची आघाडी मिळवली. अफगाणने 3 बाद 134 या धावसंख्येवरून शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 75.4 षटकात 218 धावात आटोपला. अफगाणच्या दुसऱ्या डावात कर्णधार शाहिदीने 107 चेंडूत 5 चौकारांसह 55, गुरबाजने 85 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 46, नावेद झद्रनने 3 चौकारांसह 25, जेनत आणि झिया उर रेहमान यांनी प्रत्येकी 13 धावा जमवल्या. नूर अली झेद्रानने 72 चेंडूत 3 चौकारांसह 32, तर इब्राहिम झद्रनने 1 चौकारांसह 12 धावा केल्या. आयर्लंडतर्फे मार्क अडेरने 56 धावात 3 तर मॅकर्थीने 48 धावात 3 तसेच ख्रिस यंगने 24 धावात 3 गडी बाद केले. मार्क अडेरने अफगाणच्या पहिल्या डावात 39 धावात 5 बळी मिळवले होते. त्याने या सामन्यात एकूण 8 गडी बाद केले.
आयर्लंडला निर्णायक विजयासाठी 111 धावांचे उद्दिष्ट अफगाणकडून मिळाले. आयर्लंडने 31.3 षटकात 4 बाद 111 धावा जमवत ही एकमेव कसोटी सहा गड्यांनी जिंकली. आयर्लंडच्या दुसऱ्या डावात कर्णधार बलबिर्नीने 96 चेंडूत 5 चौकारांसह 58, पॉल स्टर्लिंगने 3 चौकारांसह 14 तसेच टकेरने 2 चौकारांसह नाबाद 27 धावा जमवल्या. अफगाणतर्फे नावेद झद्रनने 2 तर मसूद आणि झिया उर रेहमान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : अफगाण प. डाव सर्वबाद 155, आयर्लंड प. डाव सर्वबाद 263, अफगाण दु. डाव 75.4 षटकात सर्व बाद 218 (शाहिदी 55, गुरबाज 46, नूर अली झद्रन 32, नावेद झेद्रान 25, इब्राहिम झद्रन 12, अवांतर 7, अडेर 3-56, मॅकार्थी 3-48, यंग 3-24), आयर्लंड दु. डाव 31.3 षटकात 4 बाद 111 (बलबिर्नी नाबाद 58, टकेर नाबाद 27, स्टर्लिंग 14, अवांतर 10, नावेद झद्रन 2-31, मसूद 1-27, झिया उर रेहमान 1-33).