आयर्लंडचा द. आफ्रिकेवर 69 धावांनी विजय
लिझाद विलियम्स ‘मालिकावीर’, पॉल स्टर्लिंग ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ अबु धाबी
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत द. आफ्रिकेने आयर्लंडचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील झालेल्या शेवटच्या सामन्यात मात्र आयर्लंडने द. आफ्रिकेवर 69 धावांनी विजय मिळवून त्यांना एकतर्फी मालिका जिंकण्यापासून रोखले. द. आफ्रिकेच्या लिझाद विलियम्सला ‘मालिकावीर’ तर आयर्लंडच्या कर्णधार स्टर्लिंगला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 284 धावा जमवित द. आफ्रिकेला विजयासाठी 285 धावांचे आव्हान दिले. पण द. आफ्रिकेचा डाव 46.1 षटकात 215 धावांत आटोपला.
आयर्लंडच्या डावामध्ये कर्णधार स्टर्लिंगने 92 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 88 धावा झळकविताना सलामीच्या बलबर्नीसमवेत सलामीच्या गड्यासाठी 101 धावांची शतकी भागिदारी केली. बलबर्नीने 73 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 45 धावा केल्या. ट्रेक्टरने 48 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 60, कॅम्फरने 36 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 34, टकेरने 3 चौकारांसह 26 धावा जमविल्या. आयर्लंडच्या डावात 6 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. द.आफ्रिकेतर्फे लिझाद विलियम्सने 56 धावांत 4 तर बार्टमन आणि फेहलुक्वायोने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेच्या डावात जेसन स्मिथने एकाकी लढत देत 93 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांसह 91 धावांची खेळी केली. द. आफ्रिकेच्या इतर फलंदाजांकडून त्याला साथ मिळाली नाही. व्हेरेनीने 36 चेंडूत 6 चौकारांसह 38, फेहलुकेवायोने 4 चौकारांसह 23, स्टब्जने 1 चौकारासह 20, फॉर्च्युनने 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. द. आफ्रिकेच्या डावात 4 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे हुमे आणि यंग यांनी प्रत्येकी 3 तर मार्क अॅडेरने 2, हॅन्ड आणि हंफ्रेज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: आयर्लंड 50 षटकात 9 बाद 284 (स्टर्लिंग 88, टेक्टर 60, बलबर्नी 45, कॅम्फर 34, टकेर 26, अवांतर 14, विलियम्स 4-56, बार्टमन व फेहलुकेवायो प्रत्येकी 2 बळी), द. आफ्रिका 46.1 षटकात सर्वबाद 215 (जेसन स्मिथ 91, व्हेरेनी 38, स्टब्ज 20, फेहलुकेवायो 23, अवांतर 13 हुमे व यंग प्रत्येकी 3 बळी, मार्क अॅडेर 2-54, हंफ्रेज आणि हॅन्ड प्रत्येकी 1 बळी)