टी-20 मालिकेत आयर्लंडची विजयी सलामी
बांगलादेशचा 39 धावांनी पराभव, हम्फ्रेज ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ चेतोग्राम
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आयर्लंडने विजयी सलामी देताना पहिल्या सामन्यात यजमान बांगलादेशचा 39 धावांनी पराभव केला. या सामन्यात 13 धावांत 4 गडी बाद करणाऱ्या आयर्लंडच्या हम्फ्रेजला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. आयर्लंडचा गेल्या 14 महिन्यातील विजयाचा दुष्काळ या विजयाने संपुष्टात आला.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी दिली. आयर्लंडने 20 षटकांत 4 बाद 184 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 20 षटकांत 9 बाद 142 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.
आयर्लंडच्या डावात हॅरी टेक्टरने 45 चेंडूत 5 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 69, टिम टेक्टरने 19 चेंडूत 6 चौकारांसह 32, कर्णधार स्टर्लिंगने 18 चेंडूत 4 चौकारांसह 21, टकेरने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18, कॅम्फरने 17 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24 तर डॉकरेलने 7 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 12 धावा केल्या. स्टर्लिंग आणि टीम टेक्टर यांनी 26 चेंडूत 40 धावांची भागिदारी केली. आयर्लंडच्या डावात 8 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 48 धावा जमविताना 1 गडी गमविला. 10 षटकाअखेर त्यांनी 2 बाद 77 धावा जमविल्या होत्या. हॅरी टेक्टरने 37 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. बांगलादेशतर्फे तान्झीम हसन शकिबने 2 तर एस. इस्लाम आणि रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावात रिदॉयने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 50 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 83 धावा झोडपल्या. जाकेर अलीने 16 चेंडूत 1 षटकारासह 20, एस. इस्लामने 13 चेंडूत 1 षटकारासह 12 धावा केल्या. बांगलादेशच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. बांगलादेशच्या डावात 5 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे हम्फ्रेजने 13 धावांत 4, मॅकार्थीने 23 धावांत 3 तर मार्क अडेरने 20 धावांत 2 बळी मिळविले. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 20 धावा जमविताना 4 गडी गमविले. 10 षटकाअखेर बांगलादेशने 4 बाद 59 धावा जमविल्या होत्या. रिदॉयने 34 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह अर्धशतक झळकविले.
संक्षिप्त धावफलक: आयर्लंड 20 षटकांत 4 बाद 181 (हॅरी टेक्टर नाबाद 69, टीम टेक्टर 32, स्टर्लिंग 21, टकेर 18, कॅम्फर 24, डॉकरेल नाबाद 12, टी. शकिब 2-41, एस.इस्लाम व रिशाद हुसेन प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश 20 षटकांत 9 बाद 142 (रिदॉय नाबाद 83, जाकेर अली 20, एस. इस्लाम 12, अवांतर 10, हम्फ्रेज 4-13, मॅकार्थी 3-32, मार्क अडेर 2-20).