For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेलिकॉप्टर अपघातात इराण राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू

06:58 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
हेलिकॉप्टर अपघातात इराण राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू
Advertisement

परराष्ट्र मंत्र्यांसह एकूण 9 जण ठार : आंतरराष्ट्रीय पातळीवर हळहळ : भारतात एक दिवसाचा दुखवटा

Advertisement

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी (63) आणि परराष्ट्रमंत्री हुसेन अमीराब्दुल्लाहियान यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने सोमवारी सकाळी ही माहिती दिली. अझरबैजानहून परतत असताना रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व 9 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे भारताने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.

 

राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यातील एक हेलिकॉप्टर रविवारी कोसळले होते. इराण आणि अझरबैजानच्या सीमेवर बांधण्यात आलेल्या किज खलासी आणि खोदाफरिन या दोन धरणांच्या उदघाटनासाठी इब्राहिम रईसी अझरबैजानला गेले होते. या उद्घाटनानंतर ते तबरेझ शहराकडे परतत असताना हेलिकॉप्टरचा अपघात झाला. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला हार्ड लँडिंग करावे लागले. सदर ठिकाण इराणच्या वर्जेकान शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. हार्ड लँडिंगनंतर विमानाला आग लागून सर्वजण मृत झाल्याचे सांगण्यात आले. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये एकही माणूस वाचलेला नाही. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी, परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दुल्लाहियान, इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलिक रहमाती, हेलिकॉप्टरचे पायलट आणि सुरक्षारक्षक प्रवास करत होते.

Advertisement

मोहम्मद मुखबेर हंगामी राष्ट्राध्यक्ष, बघेरी कानी नवे परराष्ट्रमंत्री

इब्राहिम रईसी यांच्या निधनानंतर इराण सरकारने आपत्कालीन मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. देशाचे उपराष्ट्रपती मोहम्मद मुखबेर या बैठकीचे अध्यक्ष होते. यावेळी रईसी यांना श्र्रद्धांजली वाहण्यासाठी ते ज्याठिकाणी बसायचे ती जागा रिकामी ठेवण्यात आली होती. सद्यस्थितीत उपराष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुखबेर यांना हंगामी राष्ट्राध्यक्ष करण्यात आले आहे. तर बघेरी कानी यांच्याकडे परराष्ट्रमंत्रिपद देण्यात आले आहे. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खामेनी यांनी सोमवारी ही घोषणा केली. परराष्ट्रमंत्री हुसेन अमीराब्दुल्लाहियान यांच्या निधनानंतर उप परराष्ट्रमंत्री बघेरी कानी यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

इराणमध्ये 5 दिवसांचा शोक

इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खामेनी यांनी राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या निधनानंतर देशात पाच दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान, इराणच्या सांस्कृतिक मंत्रालयाने देशातील सर्व कला आणि सांस्कृतिक उपक्रमांवर 7 दिवसांसाठी बंदी घातली आहे. रईसी यांच्या निधनानंतर इराणच्या शेअर बाजारातील व्यवहारही थांबवण्यात आले. तेहरानमधील सिक्मयुरिटीज अँड एक्स्चेंज ऑर्गनायझेशनने सोमवारी सर्व प्रकारचे व्यवसाय बंद राहणार असल्याचे जाहीर केले होते.

अमेरिकेचे निर्बंध जबाबदार : माजी परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

इराणचे माजी परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावद झरीफ यांनी राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या मृत्यूला अमेरिकेचे निर्बंध जबाबदार असल्याचे म्हटले आहे. इराणच्या विमान वाहतूक उद्योगावर अमेरिकेच्या निर्बंधांमुळे देशाला आवश्यक उपकरणे मिळू शकली नाहीत. याच कारणामुळे राष्ट्रपतींना हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमवावे लागले, असे त्यांनी म्हटले आहे.

हेलिकॉप्टर शोधासाठी व्यापक मोहीम

धुके, पाऊस, घनदाट जंगल आणि थंडीमुळे हेलिकॉप्टरचा वापर करून शोधमोहीम पार पाडणे जवळपास अशक्मय झाले होते. 20-40 पथके रस्त्याने घटनास्थळी पाठवण्यात आली. यामध्ये इराणच्या स्पेशल फोर्स आयआरजीसीच्या सदस्यांसह रेंजर्सचा समावेश होता. त्यांच्याकडे तपासासाठी ड्रोन आणि श्वानपथकेही होती. बचावकार्यात मदत करण्यासाठी रशियाने 50 बचाव विशेषज्ञ आणि दोन विशेष हेलिकॉप्टर पाठवली होती. रशियाशिवाय आर्मेनिया, अझरबैजान, इराक, कतार, सौदी अरेबिया आणि तुर्की तसेच युरोपियन कमिशनने रईसांच्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी सॅटेलाईट मॅपिंग सक्रिय केले होते. संयुक्त अरब अमिरातीने देखील मदतीची तयारी दाखवली होती.

वेगवेगळे तर्क अन् अमेरिकेचे स्पष्टीकरण

मध्य-पूर्व आशियातील शियाबहुल देश असलेल्या इराणने दोन नेते गमावल्याने जागतिक पातळीवर हळहळ व्यक्त होत आहे. एकीकडे इराण-इस्रायल यांच्यातील  संबंध संघर्षाच्या बिंदूपर्यंत बिघडले आहेत. तर दुसरीकडे अमेरिका-इराण संबंधातही तणाव आहे. अशा स्थितीत राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांना एका आपत्तीमध्ये प्राण गमवावे लागल्याने वेगवेगळे तर्क व्यक्त केले जात आहेत. तथापि, अमेरिकेच्या संसदेत डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार असणाऱ्या चक शूमर यांनी म्हटले आहे की, हेलिकॉप्टर अपघातामागे कोणतेही षड्यंत्र आहे असे आताच म्हणता येणार नाही. हेलिकॉप्टर अपघातामागे कट असल्याचे आतापर्यंत कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असेही ते म्हणाले.

भारताकडूनही शोकभावना

इराण राष्ट्राध्यक्षांच्या अपघाती मृत्यूनंतर भारताने देशात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. “इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला आणि दु:ख झाले. भारत-इराण संबंध दृढ करण्यात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. मी इराणमधील जनता आणि रईसी यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा आहे’, असे ट्विट मोदींनी केले आहे.

Advertisement
Tags :

.