इराणी-पाओलिनी, ग्रॅनोलर्स-झेबालोस दुहेरीत अजिंक्य
कनिष्ठ विभागात नील्स मॅकडोनाल्ड, लिली टॅगर विजेते
वृत्तसंस्था/ पॅरिस
ऑलिम्पिक सुवर्णविजेती इटलीच्या सारा इराणी व जस्मिन पाओलिनी यांनी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. प्रेंच स्पर्धेतील त्यांचे हे पहिलेच जेतेपद आहे. या दुसऱ्या मानांकित इटलियन जोडीने अंतिम फेरीत अॅना डॅनिलिना व अलेक्सांड्रा व्रुनिक यांचा पराभव केला. पुरुष दुहेरीत ग्रॅनोलर्स-झेबालोस, कनिष्ठ मुलांमध्ये नील्स मॅकडोनाल्ड व मुलींमध्ये लिली टॅगर यांनी अजिंक्यपद पटकावले.
गेल्या वर्षी सारा-जस्मिन यांनी या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले होते. सारा-जस्मिन यांनी डॅनिलिना-व्रुनिक यांच्यावर 6-4, 2-6, 6-1 अशी मात केली. इराणीचे हे दुसरे प्रेंच ओपन जेतेपद आहे. 38 वर्षीय साराने रॉबर्टा व्हिन्सीबरोबर यापूर्वी चांगली जोडी जमविली होती. या दोघींनी यूएस ओपन, विम्बल्डन व ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्या होत्या. साराने यावेळी प्रेंच स्पर्धेत दोन अजिंक्यपदे पटकावली. तिने मिश्र दुहेरीत आंद्रेया वावासोरीसमवेत अजिंक्यपद मिळविले आहे. पाओलिनी ही एकेरीची चांगली खेळाडू असून गेल्या वर्षी तिने येथे एकेरीचे उपविजेतेपद मिळविले होते. इगा स्वायटेकने तिला हरवून अजिंक्यपद मिळविले होते.
ग्रॅनोलर्स-झेबालोस विजेते
पुरुष दुहेरीत अनुभवी मार्सेल ग्रॅनोलर्स व होरोसिओ झेबालोस यांनी जेतेपद पटकावले. त्यांचे हे एकत्र खेळताना मिळविलेले पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. स्पेनचा 39 वर्षीय ग्रॅनोलर्स व अर्जेन्टिनाचा 40 वर्षीय झेबालोस यांची एकत्र खेळण्याची ही चौथी ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. पण ग्रँडस्लॅम क्ले कोर्टवर ते पहिल्यांदाच एकत्र खेळत होते. येथे त्यांना पाचवे मानांकन मिळाले होते. पण 2019 यूएस ओपनमध्ये उपविजेतेपद मिळविले तेव्हा त्यांना पाचवे मानांकन मिळाले होते तर 2021 व 2023 विम्बल्डनमध्येही त्यांना पाचवे मांनाकन मिळाले होते.
टॅगर कनिष्ठ मुलींमध्ये अजिंक्य
ऑस्ट्रियाची लिली टॅगरने फ्रेंच ओपन स्पर्धेत मुलींचे एकेरीचे जेतेपद पटकावले. तिने या स्पर्धेत एकही सेट गमविला नाही. या वर्षी ती या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत होती. 17 वर्षीय टॅगरने अंतिम फेरीत ब्रिटनच्या आठव्या मानांकित हन्नाह क्लुगमनचा 6-2, 6-0 असा धुव्वा उडवित जेतेपद पटकावले. प्रेंच ओपनमध्ये कनिष्ठ गटाचे जेतेपद मिळविणारी ती ऑस्ट्रियाची पहिलीच खेळाडू आहे. याआधी तिने यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या कनिष्ठ विभागात उपांत्यपूर्व फेरी गाठत सर्वोच्च कामगिरी नोंदवली होती.
नील्स मॅकडोनाल्ड मुलांमध्ये विजेता
कनिष्ठ मुलांच्या विभागात जर्मनीच्या नील्स मॅकडोनाल्डने आपल्याच देशाच्या मॅक्स शोनहॉसचा 6-7 (5-7), 6-0, 6-3 असा पराभव करून जेतेपद पटकावले. 2014 नंतर तो ही स्पर्धा जिंकणारा पहिला कनिष्ठ पुरुष टेनिसपटू आहे. 2014 मध्ये अलेक्झांडर व्हेरेव्हने कनिष्ठ विभागाचे जेतेपद पटकावले होते.