इराणी करंडक क्रिकेट स्पर्धा ऑक्टोबरमध्ये
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2024 च्या क्रिकेट हंगामातील इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेला लखनौमध्ये 1 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. इराणी करंडक स्पर्धेतील हा सामना शेष भारत आणि रणजी विजेता मुंबई यांच्यात खेळविला जाईल. या सामन्यासाठी भारतीय संघातील सर्फराज खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांना मुक्त केले आहे.
भारतीय क्रिकेट मंडळाने मंगळवारी या सामन्यासाठी शेष भारत संघाची घोषणा केली असून ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कानपूरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी क्रिकेट कसोटी 27 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या कसोटीसाठी सर्फराज खान, यश दयाल आणि जुरेल यांची अंतिम 11 खेळाडूंत निवड करण्यात आली नाही. जुरेल, यश दयाल यांचा शेष भारत संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटीसाठी ऋषभ पंतच्या सहभागाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. त्याची प्रकृती तंदुरुस्त नसल्याचे सांगण्यात आले. पंत दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध राहू शकला नाही तर त्याच्या जागी केएल राहुलला संघात स्थान दिले जाईल.
रणजी क्रिकेट स्पर्धेत सर्फराज खान मुंबई संघाचे प्रतिनिधीत्व करताना फलंदाजीत सातत्य राखले आहे. इराणी करंडक स्पर्धेत तो रणजी विजेत्या मुंबई संघाचे प्रतिनिधीत्व करेल. मुंबईचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आले आहे. इराणी करंडक स्पर्धेतील सामन्यात मुंबईचा अष्टपैलू शार्दुल ठाकुरचे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन होत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मुंबई संघामध्ये श्रेयस अय्यर, मुशिरखान, एस. मुलानी, तनुष कोटीयान यांचा समावेश राहिल. मात्र या सामन्यासाठी मुंबई संघाकडून सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबे उपलब्ध राहू शकणार नाहीत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिका ग्वाल्हेरमध्ये 6 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
शेष भारत संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिकल, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुतार, सारांश जैन, प्रसिद्ध कृष्णा, मुकेशकुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद आणि राहुल चहर