इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे प्रचंड नुकसान
संरक्षण मंत्रालयही लक्ष्य : प्रत्युत्तर कारवाईत इस्रायलमधील काही इमारती उद्ध्वस्त
वृत्तसंस्था/ जेरुसलेम, तेहरान
इस्रायल आणि इराणमधील लष्करी संघर्ष वाढत चालला आहे. रविवारी सलग तिसऱ्या दिवशी दोघांनीही एकमेकांवर हल्ले सुरू ठेवले. इस्रायली संरक्षण दलांनी (आयडीएफ) रविवारी सकाळी इराणी संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयावर आणि अणुकेंद्रांवर मोठ्या प्रमाणात हल्ला केल्याचा दावा केला. त्याचवेळी इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केल्यामुळे अनेक लोक मारले गेल्याचे वृत्त आहे.
रविवारी सलग तिसऱ्या दिवशी इस्रायलचे इराणवर हल्लासत्र सुरू होते. शनिवारी मध्यरात्रीही दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र हल्ले झाले. हल्ल्यादरम्यान इराणच्या तेल डेपो आणि गॅस रिफायनरीवरही क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलला लष्करी तळ रिकामी करण्याचा इशारा देत हल्ले तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. इराणमधील लष्करी शस्त्रास्त्र कारखान्यांना आणि त्यांच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला आहे. शस्त्रास्त्र कारखान्यांजवळ राहणे इराणी लोकांसाठी धोकादायक ठरू शकते, असे ‘आयडीएफ’चे कर्नल अविकाय अद्री यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
इराणची राजधानी तेहरानमधील एका निवासी इमारतीवर शनिवारी रात्री झालेल्या इस्रायली हल्ल्यात 29 मुलांसह 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इस्रायली हल्ल्यात इराणच्या लष्करी तळांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे उपग्रहीय छायाचित्रांमध्ये दिसून आले आहे. इस्रायलच्या ‘ऑपरेशन रायझिंग लायन’मध्ये इस्फहानमधील लष्करी सुविधा, तेहरानमधील गरमदारेहमधील क्षेपणास्त्र तळ आणि पिरानशहरमधील रडार साईटसह अनेक तळांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या हल्ल्यामुळे इराणच्या नागरी आणि संरक्षण पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामध्ये देशाच्या विविध भागांमध्ये अणु प्रतिष्ठाने आणि भूमिगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळांचा समावेश आहे. त्या तुलनेत, इस्रायलला प्रत्युत्तरात किरकोळ नुकसान झाले आहे. तथापि, इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात राजधानी तेल अवीवला इतके मोठे नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गेल्या 3 दिवसांपासून दोन्ही देशांमधील संघर्ष सुरू आहे. इराण आणि इस्रायलने शनिवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा एकमेकांवर अनेक क्षेपणास्त्रे डागली. गेल्या तीन दिवसांत इस्रायली हल्ल्यांमुळे इराणमध्ये जवळपास 200 लोक मारले गेल्याचे वृत्त आहे. तर 350 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. वाढत्या हल्ल्यांमुळे इराणची राजधानी तेहरानसह सात राज्यांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे.
इराणनेही इस्रायलवर 150 हून अधिक क्षेपणास्त्रs डागून प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये 13 इस्रायली मारले गेले आहेत. तसेच 300 हून अधिक जखमी झाले आहेत. इस्रायलच्या हैफा शहरातील बाझान तेल शुद्धीकरण केंद्राचेही (रिफायनरी) नुकसान झाले आहे. जर इस्रायलने हल्ले थांबवले नाही तर इराणदेखील जोरदार प्रत्युत्तर देईल, असे इराणने म्हटले आहे. याबद्दल इस्रायलकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही.
अणुकार्यक्रम चर्चा रद्द
दरम्यान, रविवारी ओमानमध्ये होणाऱ्या अमेरिका-इराण अणुकार्यक्रमाची चर्चा रद्द करण्यात आली आहे. इस्रायली हल्ल्यांमुळे इस्रायली चर्चेला काही अर्थ नाही, असे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी तेहरानला अमेरिकेसोबत त्यांच्या अणुकार्यक्रमावर करार करण्याचे आवाहन केले होते. इराणने करारावर स्वाक्षरी करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.