इराकमधील मोसादच्या ठिकाणांवर इराणचा हल्ला
4 जणांचा मृत्यू : सीरियातील कमांडरांच्या हत्येचा उगवला सूड
वृत्तसंस्था/ बगदाद
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने सोमवारी रात्री उशिरा इराकच्या एरबिल शहरात इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या कार्यालयांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs डागली आहेत. या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इस्रायलने या हल्ल्यावरून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. इराणने या हल्ल्याला इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेलेल्या कमांडरांचा सूड ठरविले आहे. इस्रायलने काही दिवसांपूर्वी सीरिया आणि लेबनॉनमध्ये हवाई हल्ले केले होते. यात इराणचे ब्रिगेडियर जनरल राजी मुसावी आणि हमासचा उपप्रमुख सालेह अल अरुरी यांचा मृत्यू झाला होता.
इराणचा हल्ला कुर्दिस्तानची राजधानी एरबिलपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावरील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासानजकी झाला आहे. इराकमधील इराणच्या हल्ल्यावर अमेरिकेने टीका केली आहे. हा हल्ला इराकच्या स्थैर्यासाठी मोठा झटका आहे. इराकमध्ये आणि कुर्दिस्तानात स्थैर्य निर्माण व्हावे अशी आमची इच्छा असल्याचे वक्तव्य अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मॅट मिलर यांनी केले आहे.
कुर्द उद्योजकाचा मृत्यू
इराणच्या हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांमध्ये कुर्द उद्योजक पेश्रा दिजायी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. एक रॉकेट त्यांच्या निवासस्थानावर कोसळल्याने ही जीवितहानी झाली आहे. दिजायी हे सत्तारुढ बरजानी समुदायाचे निकटवर्तीय होते. कुर्दिस्तानातील रियल इस्टेट प्रकल्पांमध्ये ते सहभागी झाले हेते. इराणच्या हल्ल्यानंतर एरबिल विमानतळावरील हवाई वाहतूक रोखण्यात आली आहे.
स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी
इराणने यापूर्वीही इराकच्या उत्तर कुर्दिस्तान क्षेत्रात हल्ले केले आहेत. या क्षेत्राचा वापर इराणी फुटिरवादी गट आणि इस्रायलचे हस्तक करत असल्याचा इराणचा आरोप आहे. इराक, इराण आणि तुर्कियेच्या सीमावर्ती भागांमध्ये कुर्द समुदायाच्या लोकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. हा समुदाय स्वत:साठी स्वतंत्र देशाची मागणी करत असून इराण याच्या विरोधात आहे.
इराकमधून अमेरिकेचे सैन्य बाहेर पडावे
गाझामध्ये हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून इराण आणि अमेरिकेदरम्यान अप्रत्यक्ष युद्धाची स्थिती आहे. दोन्ही देश इराक आणि सीरियातील परस्परांच्या ठिकाणांवर हल्ले करत आहेत. यामुळे इराकची सुरक्षास्थिती बिघडत चालली आहे. याचदरम्यान इराकचे पंतप्रधान शिया अल-सुदानी यांनी अमेरिकेच्या सैन्याने देशातून बाहेर पडावे अशी मागणी केली आहे.