आयपीएस संदीप पाटील ठरले आयर्न मॅन
बेळगाव : डेन्मार्कमधील कोपनहेगनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्लोबल चॅलेंज फिटनेस स्पर्धेत कर्नाटकातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी संदीप पाटील हे आयर्न मॅन ठरले आहेत. वर्ल्ड ट्रायथ्लॉन कॉम्पिटीशनमध्ये भाग घेऊन समुद्रात 3.8 कि.मी. पोहणे, त्यानंतर 180 कि.मी. सायकलिंग करणे, लगेच 45 कि.मी. धावण्याची स्पर्धा त्यांनी 14 तास 45 मिनिटात पूर्ण करून विक्रम केला आहे. ही स्पर्धा पूर्ण करणारेच आयर्न मॅन ठरतात. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी किमान एक वर्षापासून तयारी करावी लागते. खाण्यापिण्याचे पथ्य पाळतानाच मानसिकरीत्या सज्ज व्हावे लागते. 2004 बॅचचे आयपीएस अधिकारी असणारे संदीप पाटील यांनी ही सर्व तयारी पूर्ण करून नुकताच या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांच्या या यशाबद्दल भारत सरकार, क्रीडा प्राधिकरण, कर्नाटक सरकार व आयपीएस असोसिएशनने त्यांचे कौतुक केले आहे. संदीप पाटील यांनी बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख म्हणूनही सेवा बजावली आहे.