5 कंपन्यांचे आयपीओ होणार बाजारात सादर
टाटा टेक्नॉलॉजीजसह इतरांचा समावेश : 5 डिसेंबरला समभाग होणार लिस्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
या आठवड्यामध्ये जवळपास 5 कंपन्यांचे आयपीओ बाजारामध्ये सादर केले जाणार आहेत. इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, गंधार ऑइल रिफायनरी, फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, फ्लेयर राइटिंग इंडस्ट्रिज अशा कंपन्यांचे आयपीओ आगामी काळात बाजारात येणार आहेत.
इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचा आयपीओ 21 नोव्हेंबरला खुला होणार असून 23 रोजी बंद होणार आहे. 5 डिसेंबर रोजी कंपनीचा समभाग सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात सूचीबद्ध होणार आहे. आयपीओच्या माध्यमातून 2150 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ 22 नोव्हेंबरला खुला होणार असून 24 तारखेपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 3042 कोटी रुपयांची उभारणी कंपनी करणार असल्याचे सांगितले जात आहे. सदरचा समभाग 5 डिसेंबरला बीएसई व एनएसई सूचीबद्ध होणार असल्याची माहिती आहे. गंधार ऑइल रिफायनरी इंडिया लिमिटेड यांचा आयपीओ 22 नोव्हेंबरला खुला होऊन 24 नोव्हेंबरला बंद होणार आहे. पाच डिसेंबरला समभाग बाजारात लिस्ट होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांची उभारणी कंपनी करणार आहे.
फेडबँक फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ 22 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत खुला होणार असून या आयपीओच्या माध्यमातून 1092 कोटी रुपये उभारण्याची तयारी कंपनीने केली आहे. समभाग 5 डिसेंबर रोजी एनएसई व बीएसईवर लिस्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे. यासोबत फ्लेयर राइटिंग इंडस्ट्रीज लिमिटेड यांचाही आयपीओ आगामी काळात येणार असून या अंतर्गत 593 कोटी रुपयांची उभारणी कंपनी करणार आहे. 22 ते 24 नोव्हेंबर या कालावधीमध्ये सबक्रीप्शनकरिता आयपीओ खुला राहणार असून 5 डिसेंबरला समभाग बाजारात लिस्ट होऊ शकतो.