सीएसके-आरसीबी सामन्याने आयपीएलला प्रारंभ
22 मार्चपासून रंगणार थरार : केवळ 21 दिवसांचे वेळापत्रक जाहीर : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर उर्वरित वेळात्रक होणार जाहीर
वृत्तसंस्था /मुंबई
आयपीएलच्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक गुरुवारी (22 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आले आहे. हंगामाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर या सामन्याने होणार आहे. लोकसभा निवडणूक लक्षात घेत 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान पहिला टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार असल्याची माहिती आयपीएल अध्यक्ष अरुण धुमल यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या तारखानंतर दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर होणार आहे.
या वर्षी देशात लोकसभा निवडणुका मार्च ते मे या काळात होणार आहेत आणि आयपीएल देखील याच काळात होणार आहे. याआधी लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल देशाबाहेर खेळवण्यात आली होती. यावेळी मात्र स्पर्धा भारतातच होणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी याआधीच स्पष्ट केले होते. या दृष्टीने पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे.
मोहम्मद शमी आयपीएलबाहेर
लखनौ : आयपीएल सुरु होण्यापूर्वी गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी घोट्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. शमीच्या डाव्या घोट्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून तो लवकरच इंग्लंडला रवाना होणार असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, गुजरातकडून बदली खेळाडूची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.