आयपीएल’ 16 वा 17 रोजी पुन्हा सुरू होण्याची शक्यता
अंतिम सामना पावसामुळे कोलकाताऐवजी अहमदाबादमध्ये होण्याची चिन्हे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षामुळे स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 16 किंवा 17 मे रोजी पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून अंतिम सामना कोलकात्याबाहेर हलवला जाण्याची चिन्हे दिसत आहेत. शनिवारी झालेल्या युद्धबंदीच्या घोषणेमुळे 9 मे रोजी एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेली लीग पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आयपीएल कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि बीसीसीआय अधिकाऱ्यांनी रविवारी पुन्हा लीग सुरू करण्याच्या योजनेवर चर्चा केली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, मंडळ अजूनही योग्य वेळापत्रक तयार करण्यावर काम करत आहे. ‘सध्या आयपीएलबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. बीसीसीआयचे अधिकारी यावर उपाय शोधत आहेत. बीसीसीआयचे सचिव, आयपीएल अध्यक्ष हे विविध संघ आणि इतर सर्वांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे लवकरच निर्णय कळेल. स्पर्धा लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत’, असे शुक्ला म्हणाले.
आयपीएलच्या एका सूत्राने सांगितले की, लखनौमध्ये होणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्यातील सामन्याने लीग पुन्हा सुरू होईल. हा सामना 9 मे रोजी खेळवला जाणार होता. ‘सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंना परत बोलावण्यास सांगण्यात आले आहे. स्पर्धा 16 किंवा 17 मे रोजी लखनौमध्ये पुन्हा सुरू होईल. अंतिम वेळापत्रक सोमवारी जाहीर केले जाईल’, असे सूत्राने सांगितले.
‘बहुदा सामने चार ठिकाणी होतील आणि दिल्ली आणि धर्मशाला येथे अधिक सामने होणार नाहीत. या ठिकाणांवरील सर्व उपकरणे आधीच काढून टाकण्यात आली आहेत’, असे सूत्राने सांगितले. हैदराबादमध्ये होणाऱ्या ‘क्वालिफायर 1’ आणि एलिमिनेटरच्या ठिकाणात कोणताही बदल होणार नाही, परंतु कोलकाता अंतिम सामन्याचे यजमानपद भूषविण्यापासून वंचित राहू शकतो. याचे कारण 1 जून रोजी अंतिम सामना आयोजित केला जाण्याची शक्यता असून त्या दिवशी शहरात पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
सध्या प्ले-ऑफ टप्प्यासाठीच्या ठिकाणांत कोणताही बदल झालेला नाही. परंतु पावसामुळे कोलकाता येथे होणाऱ्या अंतिम सामन्यावर परिणाम होऊ शकतो असे दिसते. अशा परिस्थितीत अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले की, पुढील काही दिवसांत आम्ही उर्वरित सामने आयोजित करण्यासाठी संघ, ब्रॉडकास्टर, प्रायोजक आणि राज्य संघटनांशी सल्लामसलत सुरू करू आणि नंतरच लीग पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ. या टप्प्यावर आयपीएलचे महत्त्व लक्षात घेता लीग पुन्हा सुरू करण्याची वेळ निश्चित करण्यापूर्वी भारत सरकारची मान्यता घेणे देखील आवश्यक आणि विवेकी ठरेल, असे ते म्हणाले.
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील रद्द झालेला सामन्याच्या बाबतीत दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे धर्मशाला येथील सदर सामना थांबवावा लागला तेव्हा पंजाब किंग्सने 10.1 षटकांत 1 बाद 122 धावा केल्या होत्या. त्यानंतर खेळाडूंना बसने पंजाबमधील जालंधरला नेण्यात आले होते, जिथून ते ट्रेनने दिल्लीला गेले होते. जर उर्वरित 16 सामने आयोजित करण्यासाठी फक्त चार ठिकाणे निवडली गेली, तर दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स त्यांच्या घरच्या सामन्यांना मुकतील. याचा अर्थ उर्वरित स्पर्धा हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, बेंगळूर आणि लखनौपुरती मर्यादित राहील.
सीएसके, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आधीच शर्यतीतून बाहेर पडले आहेत आणि प्ले-ऑफमधील चार जागांसाठी सात संघांमध्ये स्पर्धा सुरू आहे. गुजरात टायटन्स सध्या 16 गुणांसह आणि 0.793 च्या उत्कृष्ट नेट रन-रेटसह आघाडीवर आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (16 गुण), पंजाब किंग्स (15), मुंबई इंडियन्स (14), दिल्ली कॅपिटल्स (13), कोलकाता नाईट रायडर्स (11) आणि लखौ सुपर जायंट्स (10) यांचा क्रम लागतो.