आजपासून आयपीएल फॅन पार्क सुविधा
युनियन जिमखाना मैदानावर मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शन
बेळगाव : क्रिकेट चाहत्यांना अगदी जवळून खेळ पाहता यावा यासाठी बीसीसीआयकडून शनिवारी आणि रविवारी आयपीएल फॅन पार्कचे तीन सामने मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात येणार आहेत. येथील युनियन जिमखाना मैदानावर स्क्रीन बसविली जाणार आहे. शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता आरसीबी विरुद्ध सीएसके हा सामना तर रविवारी दुपारी 2.30 वाजता केकेआर विरुद्ध राजस्थान रॉयल्स आणि सायंकाळी 6.30 वाजता पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना दाखविला जाणार आहे, अशी माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
देशातील 50 शहरांमध्ये आयपीएलचे सामने दाखविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कर्नाटकातील चार शहरांमध्ये सामने दाखविले जाणार आहेत. त्यामध्ये म्हैसूर, तुमकूर, बेळगाव आणि मंगळूर शहरांचा समावेश आहे. बेळगावात शनिवारी आणि रविवारी खास क्रिकेट चाहत्यांसाठी हे सामने दाखविले जाणार आहेत. यंदाच्या हंगामामध्ये 10 लाखांहून अधिक क्रिकेटप्रेमींचा प्रतिसाद अपेक्षित आहे. चाहत्यांना लाईव्ह ब्रॉडकास्टद्वारे स्टेडियममधील अनुभव मिळणार आहे. विशेषत: विनामूल्य प्रवेश राहणार आहे. याबरोबरच जर्सीसाठी लकी ड्रॉ सुविधा ठेवण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.