आयपीएल लिलाव : 2 कोटींच्या गटात कॅमेरॉन ग्रीनचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2026 च्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लिलावात सर्वाधिक 2 कोटी ऊपयांच्या आधारभूत किमतीसह प्रवेश करणाऱ्या 45 खेळाडूंमध्ये कॅमेरॉन ग्रीन, लियाम लिव्हिंगस्टोन, रवी बिश्नोई, वेंकटेश अय्यर आणि मथीशा पाथिराना यांचा समावेश आहे, असे वृत्त ईएसपीएनक्रिकइन्फोने दिले आहे. 30 नोव्हेंबर रोजी नोंदणी बंद झाली असून एकूण 1,355 खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे.
प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 25 जणांचा समावेश करण्याची परवानगी आहे आणि यावर्षी 77 जागा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये परदेशी खेळाडूंसाठी 31 जागा आहेत. आयपीएल सर्व दहा संघांकडून इच्छा सूची मिळाल्यानंतर ही यादी कमी करेल. 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणाऱ्या एकदिवसीय लिलावापूर्वी संघांना त्यांची सूची सादर करण्यासाठी 5 डिसेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. भारतीय खेळाडूंमध्ये खास कौशल्याच्या खेळाडूंसाठी मोठ्या बोली लागू शकतात.
परंतु यावेळी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनवर लक्ष केंद्रीत झाले आहे, जो पाठीच्या दुखापतीमुळे 2025 च्या मेगा लिलावात सहभागी झाला नव्हता. कोलकाता नाईट रायडर्स (64.3 कोटी ऊ. खर्चासाठी उपलब्ध) आणि चेन्नई सुपर किंग्ज (43.4 कोटी ऊ.) हे संघ त्याच्यात जोरदार रस दाखवण्याची अपेक्षा आहे. दोन्ही संघांचे बजेट चांगले आहे. खास करून केकेआर वेस्ट इंडिजचा टी-20 दिग्गज आंद्रे रसेलच्या अलीकडच्या आयपीएल निवृत्तीनंतर. आक्रमकपणे ग्रीनसाठी प्रयत्न करू शकतो.
केकेआरने नऊ खेळाडूंना मोकळे केले आहे, ज्यात वेंकटेश अय्यरचा समावेश आहे. त्यांच्याकडे आता 12 जागा भरायच्या आहेत, ज्यात सहा परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. पाच वेळा विजेता राहिलेल्या सीएसकेकडे नऊ जागा रिक्त आहेत, त्यापैकी चार परदेशी खेळाडूंसाठी आहेत. या लिलावापूर्वी मोकळ्या करण्यात आलेल्या अनेक खेळाडूंना 2 कोटी ऊपयांच्या सर्वोच्च किमतीच्या गटात स्थान मिळाले आहे. यामध्ये श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथीराना याचा समावेश आहे, ज्याला सीएसकेने गेल्या वर्षी 13 कोटी ऊपयांना राखले होते. परंतु दुखापतींमुळे सोडण्यात आले.
या यादीतून वगळण्यात आलेले एक उल्लेखनीय नाव म्हणजे ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आहे. पंजाब किंग्जने गेल्या हंगामात त्याला 4.2 कोटी ऊपयांना खरेदी केले होते, परंतु 37 वर्षांच्या मॅक्सवेलच्या बोटाला 2025 च्या मोहिमेच्या मध्यभागी फ्रॅक्चर झाले होते आणि त्याच्या जागी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू मिशेल ओवेनला संघात स्थान देण्यात आले होते. ज्याला कायम ठेवण्यात आले आहे. लिलावात आणखी एक आश्चर्यकारक पुनरागमन पंजाब किंग्जचा यष्टीरक्षक-फलंदाज जोश इंग्लिसचे आहे.