‘आयपीएल 2026’चा लिलाव 16 डिसेंबर रोजी
240 भारतीयांसह 350 खेळाडूंचा समावेश, क्विन्टन डी कॉकला अंतिम क्षणी स्थान
वृत्तसंस्था/ मुंबई
अबू धाबी येथे 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या आयपीएल लिलावात 240 भारतीयांसह एकूण 350 क्रिकेटपटू झळकणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचा पुनरागमन करणारा खेळाडू क्विंटन डी कॉकचा अंतिम यादीत आश्चर्यकारकरीत्या उशिरा समावेश करण्यात आला आहे.
अलीकडेच एकदिवसीय सामन्यांच्या निवृत्तीतून बाहेर आलेला यष्टीरक्षक-फलंदाज डी कॉकची मूलभूत किंमत 1 कोटी ऊपये ठेवण्यात आली आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथचाही समावेश आहे. 2021 मध्ये स्मिथ शेवटची आयपीएल खेळला होता. या लिलावासाठी एकूण 1,390 खेळाडूंनी नोंदणी केली होती. ही यादी नंतर 1005 वर आणली गेली आणि त्यानंतर जगातील या सर्वांत मोठ्या टी-20 लीगच्या 19 व्या आवृत्तीसाठी 10 संघांमध्ये उपलब्ध असलेल्या 77 जागांसाठी 350 खेळाडूंची निवड करण्यात आली.
लिलावात झळकणाऱ्या खेळाडूंच्या पहिल्या गटात भारतातर्फे खेळलेले मुंबईचे फलंदाज पृथ्वी शॉ आणि सर्फराज खान यांचा समावेश आहे. त्यांची मूळ किंमत प्रत्येकी 75 लाख ऊपये ठेवण्यात आली आहे. शॉने 2018 ते 2024 पर्यंत आयपीएलमध्ये नियमित भाग घेतला, परंतु गेल्या आवृत्तीच्या लिलावात त्याला कुणीही करारबद्ध केले नव्हते, तर सर्फराज 2021 पासून स्पर्धेत खेळलेला नाही.
आयपीएलने सादर केलेल्या यादीत कॅमेरॉन ग्रीन आणि जॅक फ्रेझर-मॅकगर्क हे दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत तसेच चेन्नई सुपर किंग्सचा माजी सलामीवीर न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांचाही समावेश आहे. या सर्वांची मूळ किंमत प्रत्येकी 2 कोटी ऊपये ठेवली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने सोडून दिलेल्या वेंकटेश अय्यरची मूळ किंमत 2 कोटी ऊपये ठेवली आहे. देशी खेळाडूंमध्ये कुणाल चंडेला आणि अशोक कुमार, जे सय्यद मुश्ताक अली टी-20 चषक स्पर्धेत अनुक्रमे सर्वाधिक धावा करणारे आणि बळी घेणारे खेळाडू आहेत, त्यांचाही अंतिम यादीत समावेश आहे.
तीन वेळचा विजेता केकेआर 64.3 कोटी ऊपयांच्या सर्वांत मोठ्या रकमेसह लिलावात उतरेल, तर पाच वेळचा विजेता सीएसके 43.4 कोटी ऊपयांसह लिलावात उतरेल. एकदा आयपीएल जिंकलेल्या सनरायझर्स हैदराबादकडे 25.5 कोटी ऊपयांची रक्कम आहे. खेळाडूंच्या या यादीत यष्टीरक्षक-फलंदाज जेमी स्मिथ, वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि कसोटी सलामीवीर बेन डकेटसह इंग्लंडचे 21 खेळाडू आहेत.
या लिलावात सर्वांचे लक्ष ज्याच्यावर राहण्याची अपेक्षा आहे तो ग्रीन 19 ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या यादीत आघाडीवर आहे. यामध्ये जोश इंग्लिस, मॅथ्यू शॉर्ट आहेत. कूपर कॉनोली आणि ब्यू वेबस्टर ही इतर प्रमुख नावे आहेत. आयपीएल लिलावात सहभागी होणाऱ्या 15 दक्षिण आफ्रिकी खेळाडूंमध्ये डी कॉक आणि मिलर यांचा समावेश आहे. तसेच वेगवान गोलंदाज एनरिच नोर्टजे, लुंगी एनगिडी, गेराल्ड कोएत्झी आणि अष्टपैलू वियान मुल्डर यांचा समावेश आहे. वेगवान गोलंदाज अल्झाई जोसेफ आणि शमार जोसेफ, अकीम ऑगस्टे, शाई होप आणि रोस्टन चेस यांचा वेस्ट इंडिजच्या नऊ खेळाडूंमध्ये समावेश आहे.
फिरकीपटू वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालगे, महेश थीक्षाना आणि ट्रेवीन मॅथ्यू हे लिलावात सहभागी श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्यासोबत पथुम निस्सांका, कुसल मेंडिस आणि कुसल पेरेरा यांचाही समावेश असेल. ‘सीएसके’ने सोडलेले कॉनवे आणि रचिन रवींद्र हे लिलावात सहभागी न्यूझीलंडच्या 16 खेळाडूंमध्ये आहेत. अफगाणिस्तानच्या 10 खेळाडूंच्या यादीत रहमानउल्लाह गुरबाज आणि नवीन उल हक यांचा समावेश आहे.