नवीन नियमांसह ‘आयपीएल 2025’चा धमाका आजपासून
आज सलामीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा मुकाबला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरशी
वृत्तसंस्था/ कोलकाता
18 व्या इंडियन प्रीमियर लीगला आज शनिवारी सुऊवात होणार असून पावसाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्यात सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत नवीन नियम आणि नवीन कर्णधारांवर बरेच लक्ष केंद्रीत राहणार असले, तरी उत्साह मात्र तोच राहणार आहे.
नियमांतील सर्वांत प्रमुख बदल चेंडूला लाळ लावण्यावरील बंदी उठवणे हा आहे. कोविड-19 या साथीच्या आजारानंतर पहिल्यांदाच गोलंदाजांना चेंडू चमकविण्यासाठी लाळेचा वापर करण्यास परवानगी असेल. मुंबईतील कर्णधारांच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. बहुतेक आयपीएल कर्णधारांचे एकमत झाल्यानंतर बीसीसीआयने ही बंदी उठवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2022 मध्ये लाळ वापरण्यावरील बंदी कायमची केली होती. परंतु आयपीएल स्वत:च्या नियमांनुसार चालते आणि या नवीन पावलाला जागतिक स्तरावरही उचलून धरले जाऊ शकते.
याशिवाय या 18 व्या हंगामात दवाच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी मोठा बदल पाहायला मिळेल. त्यानुसार, संध्याकाळच्या सामन्याच्या दुसऱ्या डावात 11 व्या षटकापासून नवीन चेंडू आणला जाईल. मात्र त्यासाठी मैदानावरील पंचांना दव हा घटक खराच प्रभावी ठरत आहे, असे वाटावे लागेल. असे असले, तरी भरपूर धावांच्या सामन्यांचा प्रवाह या हंगामतही सुरू राहण्याची शक्यता आहे. तथापि, हा नियम दुपारच्या सामन्यांना लागू होणार नाही. याव्यतिरिक्त, डिसिजन रिह्यू सिस्टीममध्ये चेंडूच्या जास्त उंचीमुळे वाइड आणि ऑफ-साइड वाइडचा समावेश करण्यात आला आहे. इम्पॅक्ट प्लेअर नियम मात्र कायम ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, ईडन गार्डन्सवर आज हंगामाची सुरुवात होत असून सतरा वर्षांपूर्वी पहिल्या आयपीएल सामन्यात ब्रेंडन मॅकलमने 158 धावांची खेळी करून लीगच्या वारशाचा पाया रचला होता. परंतु तेव्हापासून हुगळी नदीवरील पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे कारण केकेआरने तीन जेतेपदे जिंकली आहेत, तर आरसीबी अजूनही या मुकुटाच्या शोधात आहे. यावेळी, केकेआर रहाणेच्या नेतृत्वाखाली जेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल.
आजच्या सामन्यात भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचा शिल्पकार वऊण चक्रवर्ती याच्यावर लक्ष असेल, कारण तो कोहलीशी सामना करेल. कोहलीने नेटमध्ये फिरकी गोलंदाजांविऊद्ध खूप मेहनत घेतली आहे. याशिवाय केकेआरचा 36 वर्षांचा सुनील नारायण अजूनही मजबूत आहे. तो चक्रवर्तीला पूरक ठरेल आणि फिल सॉल्ट आरसीबीमध्ये गेल्याने जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई सलामीला येऊन करण्याचा प्रयत्न करेल. आरसीबीकडे असलेली सॉल्ट आणि कोहलीची शक्ती, जितेश शर्मा आणि लियाम लिव्हिंगस्टोनसारखे फिनिशर पाहता तो संघ जबरदस्त दिसतो. तथापि, मोहम्मद सिराजच्या (आता गुजरात टायटन्समध्ये समाविष्ट) अनुपस्थितीमुळे कमकुवत झालेली त्यांची गोलंदाजी हा कच्चा दुवा आहे. ईडन गार्डन्सच्या फिरकीस अनुकूल परिस्थितीत प्रभाव पाडण्यासाठी अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडवर ते अवलंबून असतील.
रिषभ पंतसाठी स्पर्धा महत्त्वपूर्ण
जीवघेण्या अपघातातून पुनरागमन केलेला रिषभ पंत त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा नवीन अध्याय सुरू करण्यास सज्ज झाला आहे. आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वांत महागडा खेळाडू ठरला असून लखनौ सुपर जायंट्सने विक्रमी 27 कोटी ऊपयांना त्याला करारबद्ध केले आहे. तो त्याच्या टीकाकारांना शांत करण्यास उत्सुक असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविऊद्धच्या टी-20 मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळूनही त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. शिवाय भारतीय टी-20 संघातील आपले स्थान पक्के करण्यासाठीही तो संघर्ष करत आहे. पंतची स्फोटक फलंदाजी शैली आणि नेतृत्व कौशल्ये बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत.
याशिवाय जसप्रीत बुमराहच्या तंदुऊस्तीविषयी एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. बेंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये परतलेला हा वेगवान गोलंदाज आयपीएलसाठी तयारी करण्याच्या बाबतीत पडताळणी करत आहे. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने आशावादी, पण सावध आहेत. कारण बुमराहची उपलब्धता केवळ मुंबई इंडियन्ससाठीच नव्हे, तर भारताच्या आगामी इंग्लंड दौऱ्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाची आहे.
धोनीचा शेवटचा हंगाम ?
आयपीएल आली की, हा महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा हंगाम आहे का हा प्रश्नही उपस्थित होतो. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला हा 43 वर्षीय खेळाडू याबाबतीत एक गूढच राहिला आहे. तो केवळ आयपीएल दरम्यानच मैदानावर उतरतो. जरी तो जुन्या काळातील सातत्याने सामना जिंकून देणारा खेळाडू राहिलेला नसला, तरी त्याची उपस्थितीही चेन्नई सुपर किंग्सला बळकटी देते. त्याचे धूर्त निर्णय, फील्ड प्लेसमेंट आणि फटकेबाजी करून खेळ संपवण्याची क्षमता त्याला एक अमूल्य ठेवा बनवते. दुसरीकडे, त्याच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान असलेला वैभव सूर्यवंशी ही राजस्थान रॉयल्सला मिळालेली एक विलक्षण फलंदाजी प्रतिभा आहे. पण तो किती सामने खेळतो हे पाहावे लागेल.
तब्बल सात संघ नवीन नेतृत्वाखाली उतरणार
नवीन नेतृत्वाखाली तब्बल सात संघ आयपीएल, 2025 ला सुरुवात करतील. अर्थात त्यापैकी काही संघांच्या बाबतीत विविध कारणांमुळे ही तात्पुरती व्यवस्था असेल. त्यापैकी सर्वांत आश्चर्यकारक निवड म्हणजे रजत पाटीदार आहे, जो भारतासाठी अद्याप टी-20 खेळलेला नाही. तो मेगास्टार विराट कोहलीचा समावेश असलेल्या आरसीबी संघाचे नेतृत्व करेल. अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करेल, ज्यामध्ये टीम इंडियाचा वरिष्ठ खेळाडू के. एल. राहुल देखील आहे. राहुल 2024 मधील लखनौ सुपर जायंट्ससोबतच्या कारकिर्दीतील निराशा दूर करण्याचा यावेळी प्रयत्न करेल.
2024 मध्ये केकेआरला गौरव मिळवून देणारा श्रेयस अय्यर पंजाब किंग्ससाठी कर्णधारपदाची धुरा सांभाळेल आणि त्याच्या जागी अजिंक्य रहाणे कोलकाता संघात जबाबदारी पेलेल. राजस्थान रॉयल्स पहिल्या तीन सामन्यांत हंगामाची सुऊवात रियान परागच्या नेतृत्वाखाली करेल, कारण संजू सॅमसनला बोटाच्या दुखापतीतून बरे होण्यास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला आहे. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रविवारी चेन्नई सुपर किंग्सविऊद्धच्या त्यांच्या सलामीच्या सामन्यात सूर्यकुमार यादव करेल, कारण हार्दिक पंड्या गेल्या हंगामातील ओव्हर-रेट उल्लंघनासाठी निलंबित झाला आहे.
सपोर्ट स्टाफमध्येही बदल
यावेळी सपोर्ट स्टाफमध्येही बदल झालेले आहेत. रिकी पाँटिंग दिल्ली कॅपिटल्समधून पंजाब किंग्समध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून गेला आहे. हेमांग बदानीने दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पाँटिंगची जागा घेतली आहे. केविन पीटरसन दिल्ली कॅपिटल्समध्ये मार्गदर्शक म्हणून सामील झाला आहे, तर राहुल द्रविड राजस्थान रॉयल्समध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून परतला आहे. गेल्या वर्षी भारताला टी-20 विश्वचषक मिळवून दिल्यानंतरचा त्याचा प्रशिक्षक या नात्याने हा पहिला आयपीएल हंगाम आहे. याशिवाय ‘सीएसके’चा अनुभवी ड्वेन ब्राव्हो यावेळी केकेआरचा मार्गदर्शक बनला आहे. त्याने भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनलेल्या गौतम गंभीरची जागा घेतली आहे.
टी-20 मध्ये पुन्हा ‘रो-को’
गेल्या वर्षीच्या भारताच्या विजयी विश्वचषक मोहिमेनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही टी-20 मधून निवृत्ती घेतली. आयपीएल, 2025 ही निवृत्तीनंतरची त्यांची टी-20 स्वरुपातील पहिली मोठी स्पर्धा आहे. आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक 741 धावा काढलेला कोहली आरसीबीचा प्रमुख खेळाडू आहे, तर रोहित मुंबई इंडियन्सतर्फे खेळताना त्याचा सूर पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करेल.