आयफोन-17 ला मिळतोय दमदार प्रतिसाद
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
12सप्टेंबरला अॅपलचा नवा आयफोन 17 लाँच झाल्यानंतर त्याच्या बुकिंगला ग्राहकांनी दमदार प्रतिसाद दिला असल्याचे पहायला मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार याआधी अॅपलने सादर केलेल्या आयफोन 16 च्या तुलनेमध्ये आयफोन 17 ला 30 ते 40 टक्के अधिक बुकिंग वाढीव प्राप्त झाले आहे. काउंटर पाँईंट रिसर्च यांच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. एकंदर अभ्यासाअंती आयफोन 16 पेक्षा आयफोन 17 यावर्षी सर्वाधिक मागणीत राहू शकतो, असे अहवालात म्हटले आहे. सुरुवातीच्या सत्रामध्ये आयफोन 17 ची मागणी आयफोन 16 च्या तुलनेत चांगली मजबूत दिसली आहे. मुख्य म्हणजे आयफोन 17 हा 256 जीबी या दमदार स्टोरेजसह आलेला आहे. याआधी आयफोन 16 हा 128 जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला होता. स्टोरेजच्या तुलनेमध्ये पाहता आयफोन 17 दमदार मानला जात आहे. या सोबतच आयफोन 17 चा नारिंगी रंगातला फोन हा सध्याला ग्राहकांसाठी हॉट फेव्हरेट ठरतो आहे. याची मागणी इतर रंगांच्या आयफोनच्या तुलनेत कैकपटीने वाढली असल्याचेही काउंटर पॉईंटच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. आयफोन 17 प्रो आणि प्रो मॅक्स या दोन्ही मॉडेलला ग्राहकांनी पसंती दर्शविलीय.