आयओएतर्फे पदकविजेत्यांना बक्षिसे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बहरीनमध्ये नुकत्याच झालेल्या युवा आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके मिळविणाऱ्या भारतीय संघातील पदक विजेत्यांना तसेच चौथे स्थान घेणाऱ्या खेळाडूला आणि प्रशिक्षकांना रोख रक्कमेची बक्षीसे देण्यात येतील, अशी घोषणा सोमवारी भारतीय ऑलिम्पिक संघटने (आयओए) च्या प्रवक्त्याने केली आहे.
या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूला 5 लाख रुपये, रौप्य पदक विजेत्या खेळाडूला 3 लाख आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूला 2 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. विविध क्रीडा प्रकारात चौथे स्थान मिळविणाऱ्या प्रत्येकी खेळाडूला रोख 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. पुरूष आणि महिलांच्या विभागातील विजेत्या कब•ाr संघांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. या स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांना प्रत्येकी 1 लाख रुपये दिले जातील.
बहरीनमध्ये ही स्पर्धा 23 ते 31 ऑक्टोबर दरम्यान झाली. या स्पर्धेत भारताने 13 सुवर्ण, 18 रौप्य आणि 17 कांस्य अशी एकूण 48 पदकांची कमाई केली. मुष्टीयुद्ध क्रीडा प्रकारात 4 सुवर्ण, बीच रेसलिंग आणि कब•ाr या क्रीडा प्रकारात अनुक्रमे 3 ते आणि 2 सुवर्णपदके भारताने मिळविली. या स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या सर्व खेळाडूंचा तसेच प्रशिक्षक वर्गाचाही सत्कार लवकरच आयओएतर्फे केला जाणार आहे.