For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदींना पाक दौऱ्याचे निमंत्रण

06:09 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदींना पाक दौऱ्याचे निमंत्रण
Advertisement

एससीओ बैठकीचे निमित्त

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पाकिस्तान आणि भारताचे संबंध अद्याप सुरळीत झालेले नाहीत. भारताने पाकिस्तानला जवळपास प्रत्येक व्यासपीठावर एकाकी पाडण्याचे प्रयत्न चालविले आहेत. याचदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका खासगी बैठकीसाठी निमंत्रित केले आहे.

Advertisement

पाकिस्तान ऑक्टोबर महिन्यात सीएचजीचे (सरकारांच्या प्रमुखांची परिषद) आयोजन करणार आहे. या बैठकीसाठी शरीफ यांनी पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठविले आहे. पंतप्रधान मोदींसोबत या बैठकीत शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) अन्य नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.  पाकिस्तान 15-16 ऑक्टोबर रोजी या बैठकीचे आयोजन करणार आहे. याचे यजमानपद आलटून पालटून प्रत्येक सदस्य देशाला प्राप्त होत असते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या देशाच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमीच आहे. परंतु भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एखादा केंद्रीय मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सामील होण्याची शक्यता आहे. एससीओच्या राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी सामील होत राहिले आहेत, परंतु यंदा ही बैठक पाकिस्तानात होणार असल्याने त्यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पाकिस्तानात होणाऱ्या बैठकीत व्हर्च्युअली संबोधित करण्याची संधी नेत्यांना मिळणार की नाही हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. एससीओत चीन, रशियासोबत भारत आणि पाकिस्तानही पूर्णवेळ सदस्य आहेत. एससीओत चीनचा दबदबा आहे. चीनने या व्यासपीठाचा वापर बीआरआयचा प्रचार करण्यासाठी केला  होता. परंतु भारताने कधीच चीनच्या या प्रकल्पाचे समर्थन केलेले नाही. तसेच मागील वर्षी एससीओच्या संयुक्त वक्तव्यात बीआरआयचा उल्लेख होण्यापासून भारताने रोखले होते.

एससीओ या संघटनेचे लक्ष्य शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य राखणे आहे, 2001 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. एससीओ चार्टरवर 2002 साली स्वाक्षरी करण्यात आली आणि ती 2003 मध्ये लागू करण्यात आली होती. एससीओच्या सदस्य देशांमध्ये चीन, रशिया, पाकिस्तान, भारत, ताजिकिस्तान, उझ्बेकिस्तान, किर्गिस्तान आणि कजाकस्तान यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.