For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न दिसणारे फ्रॅक्चर अधिक घातक

11:04 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
न दिसणारे फ्रॅक्चर अधिक घातक
Advertisement

कंबर-ओटीपोटाला होणाऱ्या फ्रॅक्चरबाबत रुग्णांनी सावध होणे आवश्यक

Advertisement

बेळगाव : पडल्यामुळे किंवा एखादा जोरदार धक्का लागल्यामुळे फ्रॅक्चर झाले तर आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेऊ शकतो. परंतु कंबर किंवा ओटीपोटाला झालेले फ्रॅक्चर आपल्याला दिसत नाही. तथापि हे न दिसून येणारे फ्रॅक्चर अधिक घातक आहे. त्यामुळे रुग्णांनी सावध होणे आवश्यक आहे, हे स्पष्ट करणारा हा लेख... मानवी शरीरात ओटीपोटाचे किंवा कमरेचे हाड एखाद्या पिशवीप्रमाणे असून त्यामध्ये आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांचा समावेश होतो. आपल्या पार्श्वभागाच्या दोन्ही बाजू आणि पायांना जोडणारा एक सांधा दोन्ही बाजूला असतो. त्यामुळे आपले खालचे शरीर संतुलित राहते. किडनी, गर्भाशय, मूत्राशय आणि छोटी आतडी आणि मोठी रक्तवाहिनी यांनादेखील या हाडामुळे संरक्षण मिळते. असे असले तरीही क्ष-किरण तपासणीमध्ये ओटीपोटाचे हाड हे मोठ्या चपट्या हाडासारखे दिसते. पण प्रत्यक्षात मात्र हे हाड बटाट्याच्या वेफर्सप्रमाणे अगदी पातळ असते. पेशी आणि अस्थीमज्जा निर्मितीचा हा जणू कारखाना असतो.

वाढत जाणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे अपघातही वाढले आहेत. त्यामुळे कमरेच्या हाडांची फ्रॅक्चर्सदेखील वाढली आहेत. सहजपणे डोळ्यांना दिसणाऱ्या हाताच्या, पायाच्या किंवा इतर फ्रॅक्चर्सच्या तुलनेत कमरेचे किंवा ओटीपोटाचे फ्रॅक्चर डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा साध्या आणि नेहमीच्या तपासणीमध्ये ते दिसत नाही. याबरोबरच वृद्ध रुग्णांमध्ये घरातल्या घरात घसरून पडल्यामुळे होणारे कमरेचे फ्रॅक्चरही सध्या खूप कॉमन झाले आहे. या फ्रॅक्चर्सना ‘सायलेंट किलर्स’ असे म्हटले जाते. कारण साध्या तपासणीत किंवा नेहमीच्या ‘एक्स-रे’मध्ये ती दिसून येत नाहीत. जर त्याकडे दुर्लक्ष झाले तर बऱ्याचवेळा रुग्णाचा अतिरक्तस्त्रावाने काही तासात मृत्यू होतो. नेहमीच्या फ्रॅक्चर्सच्या तुलनेत कमरेच्या हाडाचे फ्रॅक्चर दुर्लक्षित राहते. तसेच अनेक अवयवांना जखमा झाल्या असतील तर या फ्रॅक्चरकडे सहज लक्ष जात नाही. बऱ्याच काळानंतर ‘एक्स-रे’मध्ये जर हे फ्रॅक्चर दिसून आले तर खूपच उशीर झालेला असतो. कारण यामुळे रुग्णाच्या हालचालीवर मर्यादा येते आणि हाडाची स्थिती योग्य राहत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. स्वत:चे वजन सहन करणेही अतिशय वेदनादायी ठरते.

Advertisement

अशा हाडांच्या फ्रॅक्चरचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे यासाठी विशेष कौशल्याची आवश्यकता असते. या शस्त्रक्रिया बऱ्याच वेळखाऊ असतात. कधी कधी तर आठ-नऊ तासही अशा शस्त्रक्रियेला लागतात. शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतरही बऱ्याचशा रक्ताची आवश्यकता भासते. दोन-तीन दशकांपूर्वी या प्रकारचे फ्रॅक्चर शस्त्रक्रिया न करता औषधोपचाराने सांभाळून नेले जात असे. पण आता ताबडतोब शस्त्रक्रिया करणे सामान्य मानले गेले आहे. गेल्या आठ-नऊ वर्षांपासून 80 पेक्षाही जास्त अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया डॉ. दिनेश काळे व डॉ. साहिल काळे यांनी डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे यशस्वीरीत्या केल्या आहेत. डॉ. दिनेश काळे यांनी अमेरिकेतल्या वॅडरबिल्ट हॉस्पिटलमधून प्रख्यात डॉ. फिलीप क्रेगर यांच्याकडून शस्त्रक्रियेचे धडे घेतले. डॉ. दिनेश काळे हे 2023 साली ‘असोसिएशन ऑफ पेल्विस अॅसिटाब्युलर सर्जन्स ऑफ इंडिया’चे अध्यक्ष होते आणि त्यांनी यशस्वीरीत्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेमध्ये भारत आणि भारताबाहेरील 5 देशांतून सुमारे 200 डॉक्टर्स सहभागी झाले होते

बेळगाव किंवा बेळगावच्या आसपास नव्हे तर कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा अशा अनेक ठिकाणच्या रुग्णांनी केएलई हॉस्पिटलमधून या शस्त्रक्रियेचा लाभ घेतला आहे. डॉ. दिनेश काळे यांनी आतापर्यंत भारतातल्या 20 पेक्षा जास्त मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले आहेत. तसेच भारत आणि नेपाळ येथे 40 हून जास्त कॅडॅव्हरिक वर्कशॉप घेतली आहेत. शस्त्रक्रिया जर वेळेवर केली तर जखम लवकर भरून येते आणि लवकर हालचाल सुरू करता आल्यामुळे आपल्या नेहमीच्या कामांना सुरुवात करता येते. या शस्त्रक्रियेसाठी केएलई हॉस्पिटलमध्ये ज्याप्रमाणे आयसीयू सेटअपसह चांगला विभाग आहे, तशा विभागाची आवश्यकता असते.

Advertisement
Tags :

.