खोतवाडीत एकमेकांवर वारदोघे चुलत भाऊ ठार
जमिनीचा वाद : जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट
वार्ताहर /अथणी
कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या खोतवाडी (ता. अथणी) येथे शेत जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावांनी एकमेकांवर धारधार शस्त्राने सोमवारी वार केले. त्यामुळे त्यांना कवठेमहांकाळ येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना दोघांचाही मंगळवारी मृत्यू झाला. खंडू तानाजी खोत (वय 25) व हनुमंत रामचंद्र खोत (वय 37) अशी मृतांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून खंडू व हणुमंत यांच्यात शेतजमिनीतून वाद होत होते. सोमवारी सदर वाद विकोपाला गेल्याने दोघांनी एकमेकांवर धारधार शस्त्राने वार केला. दरम्यान हा प्रकार घडला त्यावेळी परिसरात कोणीच नव्हते. मात्र ही घटना समजताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना कवठेमहांकाळ येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले.
त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचार सुरु असताना त्या दोघांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. खोत कुटुंबीयांच्या नावे 40 एकर शेतजमीन आहे. त्याची वाटणी होत नव्हती. शिवाय आपल्या नावावर जमीन व्हावी, यासाठी त्यांच्यात वाद होत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माहिती मिळताच कवठेमहांकाळ येथे सरकारी रुग्णालय व घटनास्थळाला जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद, डीवायएसपी श्रीपाद जल्दे, सीपीआय रवींद्र नायकवडी, पीएसआय शिवानंद कारजोळ यांनी भेट दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.