दुप्पट नफ्याच्या आमिषाने गुंतवणूकदाराला 2 कोटींचा गंडा
बेंगळूरमधील घटना : सायबर गुन्हे विभागाकडून तपास गतीमान
बेंगळूर : अधिक नफा मिळवून देण्याच्या आशेने ऑनलाईन गुंतवणुकीवर विश्वास ठेवलेल्या व्यक्तीला 2 कोटी रुपये गमवावे लागले आहेत. फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी एका कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बेंगळूरमधील सायबर गुन्हे विभागात एफआयआर दाखल झाला आहे. तक्रारदार व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, 1 मे 2022 रोजी अंकित नामक व्यक्तीने व्हॉट्सअॅप संदेश पाठविला.
एका कंपनीचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. माझ्यामार्फत कोणतीही गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा मिळेल अशी ग्वाही दिली होती. अंकितने त्याच्यासोबत असणाऱ्या सुमीत जयस्वाल, कुशागर जैन आणि अखिल यांच्याशी ओळख करून दिली. हे तिघेही विदेशी गुंतवणूक विभागात काम करत असून यामध्ये गुंतवणूक केल्यास अधिक लाभ मिळविता येईल, असे आमिष दाखविले.
या आमिषाला बळी पडलेल्या व्यक्तीला अंकित जयस्वालने व्हॉट्सअॅपद्वारे गंतवणुकीची माहिती देऊन ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचे भासविले. त्यानंतर त्या व्यक्तीने सुरुवातीला जयस्वालने दिलेल्या क्युआर कोडवर 3,500 रुपये पाठविले. लवकरच लाभ म्हणून 1,000 रु. नफा स्वरुपात देण्यात आले. यामुळे आरोपींवर विश्वास बसल्याने त्या व्यक्तीने रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. मात्र, काही दिवसांनी आरोपींनी गुंतवणूकदाराशी संपर्क तोडल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघड झाले.