शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक : साडे तीन कोटीची फसवणूक
तासगाव :
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा त्याचा 5 टक्के परतावा दरमहा देतो असे आमिष दाखवून तासगांव तालुक्यातील बोरगांवसह परिसरातील 24 जणांची एकूण 3 कोटी 50 लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात तासगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अरूण नानासो पाटील (रा.बोरगांव, ता.तासगांव) यांनी सचिन मारूती पाटील (रा.बोरगांव ता.तासगांव) व अमेय गुणवंत चव्हाण (रा.तासगांव) यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मे 2019 मध्ये सचिन पाटील यांनी अऊण पाटील यांना माझा मित्र अमेय चव्हाण हा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो. त्याला गुंतवणेसाठी पैसे दिले की, गुंतवणुकीवर 5 टक्के महिना परतावा देतो. मुद्दल त्याच्याकडे सुरक्षित राहते, जेव्हा मुद्दल लागणार आहे तेव्हा त्यास एक महिना अगोदर सांगावे लागते असे सांगितले. अऊण यांना सचिनने पैसे गुंतवण्यास सांगितले.
सुरुवातीला अरुण यांनी 1 लाख सचिन पाटील यांच्या पत्नी यांच्या नावे चेक स्वरूपात दिले. या रक्कमेचा परतावा एक महिन्याने आल्यानंतर फिर्यादींचा विश्वास बसला. त्यांनी लगेच 2 लाख चेक स्वरूपात दिले. त्यानंतर वेळेवर पैसे मिळत असल्याने फिर्यादी यांनी दीड वर्षात सात लाख पन्नास हजार रूपये चेक स्वरूपात दिले. अमेय चव्हाण यांचे खातेवर एक लाख रूपयेचा चेक जमा केला. दीड वर्षानंतर फिर्यादींना परतावा येणे बंद झाले.
अरुण यांनी सचिनकडे विचारणा केली असता सचिन पाटील व अमेय चव्हाण यांनी सध्या शेअर मार्केट पडल्यामुळे नुकसान झाले आहे.त्यामुळे आपण परतावा देणार होतो तो सद्या थांबवत आहे. थोड्या दिवसांनी परत पे चालु करणार आहोत. शेअर मार्केट मध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सचिन पाटील व अमेय चव्हाण यांनी फिर्यादीकडे आणखी पैशाची मागणी केली. जेवढे जास्त पैसे आपण लावू तेवढे जास्त पैसे आपणाला मिळतील असे सांगून अजून पैसे भरण्यास सांगितले.
अरुण यांनी विश्वास ठेवून पाच लाख रूपये चेक स्वरूपात सचिन पाटील यांच्या पत्नी यांच्या बँक खात्यावर दिले. परंतु त्यांचे कडून फिर्यादी यांना पैसे न आल्याने फिर्यादी यांनी सचिन पाटील यांना परताव्याबाबत विचारणा केली. त्यावर पैसे देतो थोडे थांबा असे सांगितले. फिर्यादीने एकूण बारा लाख पन्नास हजार रूपयांची गुंतवणूक केली असून त्यांना 7 लाख 62 हजार परतावा मिळालेला आहे. 4 लाख 88 हजार अद्याप पर्यंत मिळालेले नाहीत.
दर महिन्याला सचिन पाटील व अमेय चव्हाण दोघे मिळून मिटींग घेत होते. त्या मिटींगला फिर्यादी यांच्यासारखे पैसे गुंतवणूक करून परतावा न मिळालेले बरेच लोक येत होते. फिर्यादी यांना समजले की आपल्या प्रमाणेच इतर गुतंवणुकदार रोहित पाटील, रणधिर पाटील, अनिकेत पाटील, मनोजे पाटील, रवींद्र पाटील, नितीन पाटील, विनोद पाटील, रमेश जाधव, सुरेश आरवे, सुशांत मुळीक, फिरोज हेर्लेकर, रमेश लकडे, ओमकार कुंभार, अमोल कोकाटे, प्रमोद पाटील, गणेश कुंभार, बाळासाहेब माने, अरविंद पाटील, प्रमोद पाटील, बाबुलाल मुल्ला, गिता जाधव, मारूती पाटील, रूपाली पाटील असे आहेत. यांचेकडून ऑनलाईन व रोखीने रक्कम गोळा करून सचिन पाटील यांचे पत्नी यांचे बँक खातेवर जमा केलेली आहे. रोखीने सचिन पाटील यांना वेळोवेळी 5 कोटी 30 लाख रूपये एवढी रक्कम दिलेली आहे. यापैकी 1 कोटी 80 लाख रूपये मिळालेले असून उर्वरित 3 कोटी 50 लाख रूपये रक्कम अद्याप पर्यंत सचिन पाटील व अमेय चव्हाण यांनी दिलेली नाही.