मुनिरत्न यांच्यावरील आरोपांचा तपास एसआयटीमार्फत
राज्य सरकारचा आदेश : आयपीएस अधिकारी बी. के. सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली पथक नियुक्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरच्या राजराजेश्वरीनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार मुनिरत्न यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाल्याने राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपविला आहे. जात अवमानना, लाच मागणी, जीवे मारण्याची धमकी आणि अत्याचाराचा आरोप मुनिरत्न यांच्यावर झाला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्धच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी. के. सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली एसआयटीचे पथक नेमले आहे.
बेंगळूरच्या केंद्रीय विभागाचे पोलीस महानिरीक्षक लभुराम, रेल्वे पोलीस अधीक्षक सौम्यलता आणि पोलीस अधीक्षक सी. ए. सायमन हे या विशेष पथकातील सदस्य आहेत. या पथकाला मुनिरत्न यांच्याविरुद्ध यापुढे दाखल होणाऱ्या तक्रारींचाही तपास करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
काँग्रेसमधील वक्कलिग समुदायाच्या लोकप्रतिनिधींनी गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन मुनिरत्न यांच्याविरुद्धच्या आरोपांविषयी एसआयटीमार्फत तपास करावा, असे निवेदन दिले होते. शिवाय मुनिरत्न यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाल्याने सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. त्यामुळे मुनिरत्न यांची अवस्था ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी झाली आहे.
13 सप्टेंबर रोजी बेंगळूरमधील कंत्राटदार चेलुवराजू यांनी मुनिरत्न नायडू यांच्यावर जीवे मारण्याची धमकी, लाच देण्याची मागणी आणि जात अवमानना केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, अनुसूचित जमातीतील एका नेत्याने जात अवमानना प्रकरणी मुनिरत्न यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मुनिरत्न यांच्याविरुद्ध बेंगळूरच्या वय्यालिकावल पोलीस स्थानकात दोन एफआयआर दाखल झाले होते. जात अवमानना प्रकरणात त्यांना अटक झाली होती.
तर 18 सप्टेंबर रोजी 40 वर्षीय एका महिलेने मुनिरत्न यांच्याविरुद्ध अत्याचार, धमकी आणि हनिट्रॅपचा आरोप करत तक्रार दाखल केली. रामनगर जिल्ह्यातील कग्गलीपूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. जात अवमानना प्रकरणात मुनिरत्न यांना शुक्रवारी जामीन मिळताच अत्याचार प्रकरणात रामनगरच्या कग्गलीपूर पोलिसांनी त्यांना अटक केली. मुनिरत्न यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे.
अत्याचार प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या आमदार मुनिरत्न यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. कंत्राटदाराला धमकी आणि जात अवमानना प्रकरणात कारागृहात गेलेल्या मुनिरत्न यांची शुक्रवारी जामिनावर मुक्तता झाली. मात्र, अत्याचार प्रकरणात त्यांना पुन्हा अटक झाली. त्यांना शनिवारी बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.