यमकनमर्डीतील जबरी चोरीचा तपास
सव्वाकिलो सोने, साडेआठ किलो चांदी जप्त : अट्टल गुन्हेगाराला थार वाहनासह अटक
बेळगाव : ऐन दिवाळीत यमकनमर्डी, ता. हुक्केरी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सव्वाकिलो सोने व साडेआठ किलो चांदीचे दागिने पळवणाऱ्या अट्टल घरफोड्याला यमकनमर्डी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून मोठ्या प्रमाणात दागिने व रोकड जप्त करण्यात आली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली. पोलीस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख आर. बी. बसरगी, जिल्हा सीईएनचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी, गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी आदी अधिकारी उपस्थित होते. महिंद्रा थार वाहनातून चोरीचे दागिने घेऊन त्यांची विक्री करण्यासाठी कोल्हापूरला जाताना आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
सुरेश मारुती नाईक ऊर्फ सनदी (वय 37) मूळचा राहणार होसूर, ता. बेळगाव, सध्या राहणार महांतेशनगर असे त्या घरफोड्याचे नाव आहे. त्याच्याजवळून 1 किलो 280 ग्रॅम सोने, साडेआठ किलो चांदी, सव्वालाख रुपये रोख रक्कम, एक महिंद्रा थार जिप, एक कावासाकी व एक पल्सर अशा दोन मोटारसायकली असा सुमारे एक कोटीपेक्षा अधिक ऐवज जप्त करण्यात आला आहे. यमकनमर्डी मुख्य बाजारपेठेत असलेल्या अजित दुगाणी यांच्या घरी चोरी झाल्याचे 22 ऑक्टोबर रोजी उघडकीस आले होते. ऐन दिवाळीत चोरीची ही घटना घडली होती. अजित व त्यांचे कुटुंबीय 16 ऑक्टोबर रोजी आपल्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बेंगळूरला गेले होते. घराची निगराणी करण्यासाठी त्यांनी आपल्याच एका नातेवाईकाला सांगितले होते.
त्यांच्या घरातून 1 किलो 280 ग्रॅम सोने, साडेआठ किलो चांदी व सव्वा लाख रुपये रोख रक्कम पळविण्यात आली होती. यासंबंधी यमकनमर्डी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्या नेतृत्वाखाली यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व इतर अधिकाऱ्यांचा समावेश असलेली चार पथके नियुक्त करण्यात आली होती. या पथकातील अधिकारी व पोलिसांनी वैज्ञानिकरीत्या प्रकरणाचा छडा लावून सुरेश या खतरनाक गुन्हेगाराला अटक केली आहे. 6 जानेवारी 2025 रोजी मणगुत्ती येथे त्याने चोरी केली असून 22 एप्रिल 2024 रोजी यमकनमर्डीत चोरी केल्याची कबुली दिली आहे. संकेश्वर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातही त्याने गुन्हे केले आहेत.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस पथकातील अधिकारी व पोलिसांना शेतकरी आंदोलनामुळे ते काम करीत असलेल्या पोलीस स्थानकाला परत पाठविण्यात आले होते. शेतकरी आंदोलन संपल्यानंतर पुन्हा तपासाला गती मिळाली. गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, पोलीस उपनिरीक्षक एस. के. मण्णीकेरी, पोलीस उपनिरीक्षक एम. के. मुगळी, पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. पाटील, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल नाईक, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. एस. चिन्नीकुप्पी, पुरुषोत्तम नाईक, अर्जुन मसरगुप्पी, एस. एल. गळतगी, वाय. डी. गुंजगी, गजानन कांबळे, गोविंद नागन्नावर, प्रवीण किल्लीकेतर, पोलीस विठ्ठल नाईक, एम. एम. करगुप्पी, एस. एम. चौगला, प्रल्हाद बंडगार, तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कन्नावर, एल. एस. जोक्कानट्टी आदींचा या पथकात समावेश आहे. या पथकात केवळ यमकनमर्डीच नव्हेतर गोकाक, संकेश्वर, चिकोडी, अथणी, हुक्केरी पोलीस स्थानकांतून अधिकारी व पोलिसांचा सहभाग होता.