हाँगकाँगमधील आगप्रकरणी तपासाला गती
जवळपास दीडशे जणांचे मृतदेह हाती : अजूनही 200 हून अधिक बेपत्ता : इमारतींमध्ये शोधमोहीम
वृत्तसंस्था/ हाँगकाँग
हाँगकाँगच्या ताई पो जिह्यातील बहुमजली निवासी संकुलात बुधवारी लागलेल्या आग दुर्घटनेच्या तपासाला गती देण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत जवळपास दीडशे जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. अजूनही 200 हून अधिक जण बेपत्ता आहेत. 76 जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हाँगकाँग सरकारने या घटनेची गुन्हेगारी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी कंत्राटदारासह दोन अधिकाऱ्यांना नियमांनुसार नसलेले साहित्य वापरल्याबद्दल अटक केली आहे. जुलै 2024 पासून या संकुलात बांधकामाचे काम सुरू होते. स्टायरोफोम आणि बाह्य ग्रिल्स सारख्या ज्वलनशील पदार्थांमुळे आग वेगाने पसरली. निवासी संकुल बहुमजली असल्यामुळे अपार्टमेंट आणि कॉरिडॉरमध्ये अवघ्या काही मिनिटांमध्ये आग पसरल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
आग लागलेल्या निवासी संकुलांमधील 32 मजली इमारतींचा समावेश आहे. जवळ-जवळ असलेल्या आठ बहुमजली इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या असून त्यामध्ये साडेचार हजारहून अधिक लोक वास्तव्य करत होते. आगीचे कारण निश्चित करण्यासाठी सर्व सार्वजनिक गृहनिर्माण प्रकल्पांची सखोल चौकशी केली जाईल, असे हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ली का-च्यू यांनी सांगितले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही शोक व्यक्त करत सर्व रहिवाशांना मदत करण्यासाठी आणि नुकसान भरून काढण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
हाँगकाँगच्या तैपो परिसरातील 40 वर्षे जुन्या वांग फुक कोर्ट इमारतीत लागलेल्या आगीसाठी नूतनीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूला जबाबदार धरले जात आहे. तथापि, तज्ञांच्या मते, बांबूचे मचान हे आगीचे एकमेव कारण नव्हते. प्लास्टिक जाळ्या, अग्निरोधक नसलेले पडदे आणि खिडक्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टायरोफोममुळे आगीचा जलद प्रसार झाला. आता तपासातूनच नेमके कारण स्पष्ट होणार असले तरी अनेक जणांचा बळी गेल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.