मल्लिकार्जुननगरातील घरफोडीचा तपास
तिघा चोरटे गजाआड, आणखी एका प्रकरणात महिलेला अटक, साडेसात लाखांचा ऐवज जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
बंद घराचा कडीकोयंडा तोडून दागिने पळविणाऱ्या एका त्रिकुटाबरोबरच बसमधील प्रवासी महिलेच्या बॅगमधील दागिने पळविणाऱ्या महिलेलाही मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून 7 लाख 53 हजार 500 रुपये किमतीचे 68.05 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक एच. एल. केरुर, लक्ष्मण कडोलकर, नवीनकुमार ए. बी., एस. बी. मडिवाळर, विश्वनाथ माळगी, आसिरअहमद जमादार, शंकर कुगटोळ्ळी, सुरेश कांबळे, कार्तिक जी. एम., एम. बी. वडेयर, मल्लिकार्जुन गुदगोप्प, यमनाप्पा कांबळे, सुजाता नंदिहळ्ळी, प्रतिभा गि•ण्णावर, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद आदींनी ही कारवाई केली आहे. मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
मल्लिकार्जुननगर, बेळगाव येथे 21 नोव्हेंबर 2025 च्या सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. हरीष लच्चू शेट्टी यांच्या घरी चोरी झाली होती. चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरातील 47.05 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, 8 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 4 लाख 83 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पळविला होता. यासंबंधी 1 डिसेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता.
मल्लिकार्जुननगर येथील चोरी प्रकरणी इस्माईल कासिम सय्यद, राहणार गोकुळ गल्ली, जुने गांधीनगर, हसन वली सय्यद, राहणार सत्यसाई कॉलनी, वैभवनगर, वेंकटेश प्रकाश कट्टीमनी, राहणार गोकुळ गल्ली, जुने गांधीनगर या तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून 44.05 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यांची किंमत 4 लाख 89 हजार 500 रुपये इतकी आहे.
निपाणीतील महिलेला अटक
दि. 28 एप्रिल 2024 रोजी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या बॅगमधील 24 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते. यासंबंधी मारुत्याप्पा यलीगार, मूळचे राहणार डंबळ, जि. गदग, सध्या राहणार अंजनेयनगर यांनी त्याचवेळी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. मारुत्याप्पांच्या पत्नीच्या व्हॅनिटी बॅगमधील दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी निपाणी येथील आरती हरी चौगुले या महिलेला अटक करून तिच्याजवळून 24 ग्रॅमचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यांची किंमत 2 लाख 64 हजार इतकी आहे.