जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन खटल्यात तपास अधिकाऱ्याची साक्ष
बेळगाव : येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक हटविल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात कोणतीही सभा, समारंभ घेण्यावर निर्बंध घातले होते. तरीदेखील पंचमुखी (क्षेमा) हॉटेलमध्ये सभा घेतल्याचा ठपका ठेवत उद्यमबाग पोलिसांनी महाराष्ट्रातील पाच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या खटल्याची सुनावणी चौथे जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी उद्यमबागचे तत्कालीन तपास अधिकारी यू. बी. कट्टीकर यांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्याची पुढील सुनावणी 15 सप्टेंबर रोजी होणार आहे.
महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटविण्यात आल्याने 2014 मध्ये बेळगावात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी 1 ऑगस्ट 2014 पासून शहरात कोणत्याही प्रकारची सभा समारंभ घेण्यावर निर्बंध लादले होते. तरीदेखील महाराष्ट्रातून शिवसेनेचे हर्षल मनोहर कदम, गणपती मारुती साळुंखे, दादासो अनंत पानसकर, प्रमोद हणमंत चव्हाण, अभिजित रामचंद्र पाटील यांनी पंचमुखी (क्षेमा) हॉटेलमध्ये सभा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत उद्यमबाग पोलिसांनी वरील पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
उद्यमबागचे तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक व तपास अधिकारी यू. बी. कट्टीकर यांनी तपास करून न्यायायलात दोषारोप दाखल केला. त्यामुळे सदर खटल्याची सुनावणी चौथे जीएमएफसी न्यायालयात सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी तपास अधिकारी यू. बी. कट्टीकर यांची साक्ष नोंदविण्यात आली. आता या खटल्याची पुढील सुनावणी 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळी बेळगावचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर उपस्थित होते. संशयिताच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर, अॅड. कुमार इटगीकर, अॅड. शंकर बाळनाईक हे काम पहात आहेत.