इंडस टॉवर्स लि.च्या गैरकारभाराची चौकशी करा
भारतीय प्रायव्हेट टेलिकॉम मजदूर संघाचे शहर पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : इंडस टॉवर्स लिमिटेडने कामगारविरोधी धोरण राबविले आहे. कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना कामावरून कमी करण्याचे कुटिल प्रयत्न सुरू आहेत. या कंपनीच्या गैरकारभाराची चौकशी करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी भारतीय प्रायव्हेट टेलिकॉम मजदूर संघाच्या सदस्यांनी केली आहे. सदस्यांनी मोर्चाने शहर पोलीस आयुक्त कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, भारतीय प्रायव्हेट टेलिकॉम मजदूर संघाचे आम्ही सदस्य बोंडाड इंजिनिअरिंग सव्हिसेसमार्फत इंडस टॉवर्स लिमिटेडमध्ये काम करीत आहोत.
आम्ही कर्मचाऱ्यांनी 8 तासाचे काम, साप्ताहिक सुटी, राष्ट्रीय सण, उत्सवाच्या निमित्ताने सुटी यासारख्या कायदेशीरित्या सुविधांची मागणी केल्यानंतर इंडस टॉवर्स लि. च्या प्रमुखानी बोंडाड इंजिनिअरिंग सव्हिसेसशी केलेला करार रद्द करून अन्य कंपन्यांशी करार केला आहे. तसेच कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे कारस्थान चालविले आहे. एकंदरीत सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांना कमी करून नव्याने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा कंपनीचा विचार असल्याचे स्पष्ट होते. याबाबत आम्ही प्रादेशिक कामगार आयुक्तांकडे तक्रार मांडली आहे. निवेदनावर सतीश निलजकर, भगवंत, मंजुनाथ अमरापुरे, गोपाळ बिडरगड्डी, संतोष कांतण्णवर, माऊती हणबर, नवीन बदली, संजीव अथणी, दिनकर माने यांच्या सह्या आहेत.