For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुद्रेमनीच्या महिलेच्या दागिन्यांचा शोध

11:52 AM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुद्रेमनीच्या महिलेच्या दागिन्यांचा शोध
Advertisement

निपाणीच्या महिलेला अटक : मोटारसायकल चोरीचाही छडा, चोर पोलिसांच्या जाळ्यात

Advertisement

बेळगाव : बसमध्ये प्रवास करताना कुद्रेमनी येथील महिलेच्या बॅगमधील दागिने पळविल्याच्या आरोपावरून बुद्धनगर, निपाणी येथील एका महिलेला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याजवळून तीन लाख रुपये किमतीचे 43 ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत. याबरोबरच एक मोटारसायकल चोरही पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक एच. एल. केरुर, लक्ष्मण कडोलकर, शिवाप्पा तेली, आय. एस. पाटील, शंकर कुगटोळ्ळी, सुरेश कांबळे, कार्तिक एम. जी., अनिता हंचनाळ आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. यरनाळ, ता. निपाणी सध्या रा. कुद्रेमनी येथील सविता कृष्णात मगदूम या निपाणीहून बेळगावलापरिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करीत होत्या. दि. 14 सप्टेंबर रोजी यरनाळ येथील आपल्या माहेरी जाऊन कुद्रेमनीला येताना बसमध्ये त्यांच्या व्हॅनिटी बॅगमधील 43 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते. यासंबंधी 19 सप्टेंबर रोजी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी बुद्धनगर रेणुकामंदिराजवळ, निपाणी येथील पूनम अमित सकट (वय 39) या महिलेला अटक करून तिच्याजवळून 43 ग्रॅमचे दागिने जप्त केले आहेत. बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या बॅगमधील दागिने पळविण्यात पूनम सराईत आहे. शनिवार दि. 28 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सत्यसाई कॉलनी, वैभवनगर येथील इरफान रफिक शेख (वय 22) या तरुणाला अटक करून त्याच्याजवळून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. दि. 20 डिसेंबर 2023 रोजी आझादनगर येथील मोहम्मद इलियास गौस मोहिद्दीन मुल्ला, मूळचे रा. देशनूर, ता. बैलहोंगल यांची मोटारसायकल चोरण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना रविवारी इरफानला अटक करून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत 1 लाख 20 हजार रुपये इतकी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.