कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीगणेशगीतेची ओळख

06:40 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

सूत मुनींनी व्यास मुनींना विनंती केली की, ब्रह्मस्वरूपी अमृत मिळवून देणारे योगामृत, कृपा करून मला सांगा. अमृत पिऊन मनुष्य अजरामर होऊ शकतो पण त्या आयुष्याचा स्वत:च्या कल्याणासाठी उपयोग करून घेतला नाही तर त्या लांबलचक जीवनाचा काय उपयोग? म्हणून आपलं कल्याण साधून देणारे ब्रह्मज्ञानरुपी अमृत मिळवणे हेच माणसाच्या आयुष्याचे उद्दिष्ट असायला हवे. गणेशगीतेच्या अध्ययनाने ब्रह्मस्वरूपी अमृत मिळते हे व्यासमुनांना माहीत होते म्हणून ते म्हणाले,

Advertisement

अथ गीतां प्रवक्ष्यामि योगमार्गप्रकाशिनीम् ।

नियुक्ता पृच्छते सूत राज्ञे गजमुखेन या ।। 4 ।।

अर्थ-व्यास म्हणाले, हे सुता, असाच प्रश्न करणाऱ्या वरेण्यराजाला गजाननाने जी गीता सांगितली ती योगमार्ग प्रकाशित करणारी असून ती प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप श्रीगणेशाच्या पवित्र मुखातून प्रकट झालेली आहे

विवरण-ज्ञानाने भारलेली ही गणेशगीता ही प्रत्येक गणेशभक्ताने अखंड चिंतन करावे अशीच आहे. ती आता मी तुला सांगतो. असं म्हणून व्यासमुनींनी गणेशगीता सूत मुनींनी सांगितली. पुढे महात्मा शौनकाने सुतमुनींना अशीच विनंती केल्यावरून सूत ऋषींनी व्यासाच्या मुखांतून श्रवण केलेली गीता त्यांना सांगितली.

पुढे शौनकमुनींनी सूत मुनींना योगामृत सांगण्याची विनंती केल्यावर सूत मुनींनी त्यांना गणेशगीतेचे श्रवण करवले. असं एकीकडून दुसऱ्याकडे श्रीगणेशगीता जात राहिली. असा प्रसार होत आज ती आपल्या सुदैवाने आपल्यापर्यंत आलेली आहे. आपण ती मन:पूर्वक अभ्यासून त्याप्रमाणे आचरण करण्याचा निश्चय करूयात.

पहिल्या अध्यायाचं नाव सांख्यसारार्थयोग असं आहे. सांख्यबुद्धी म्हणजेच ज्ञानबुद्धी आणि अध्यात्मात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, थोडक्यात या अध्यायात आत्मज्ञानाचं सार काय आहे आणि ते जीवनात कसं प्राप्त करून घ्यायचं याबद्दल बाप्पांनी उपदेश केलेला आहे. आता प्रत्यक्ष गणेशगीतेला सुरवात करूयात.

वरेण्य उवाच -

विघ्नेश्वर महाबाहो सर्वविद्याविशारद ।

सर्वशास्त्रार्थतत्त्वज्ञ योगं मे वत्तुमर्हसि  ।।5।।

अर्थ-वरेण्य म्हणाला, सामर्थ्यसंपन्ना, महाबाहु सर्व विद्या उत्तम प्रकारे जाणणाऱ्या, सर्व शास्त्रांच्या अर्थाचे तत्त्व जाणणाऱ्या, हे विघ्नेश्वरा, मला तूच योग सांग.

विवरण- वरेण्य राजाने बाप्पांकडे मला तूच योग सांग असा हट्ट धरला. आता बाप्पांकडे हट्ट धरायचा आणि बाप्पांकडून तो पुरवून घ्यायचा म्हणजे अधिकारही तसाच हवा. राजाचा अधिकार मोठा होता. वरेण्य राजा हा बाप्पांचा थोर भक्त होता. त्याचं बाप्पाशी निरंतर सख्य असल्याने तो बाप्पांना अतिशय प्रिय होता. हेच त्याने केलेल्या हट्टावरून दिसून येते. तसेच या गीतेच्या तत्वज्ञानाचा अवलंब करून सर्व जगाचा उध्दार व्हावा असा त्याचा उदात्त हेतू होता. म्हणून आपल्या प्रिय भक्ताचा हट्ट पुरवण्यासाठी बाप्पा त्याला गणेशगीता सांगू लागले.

श्रीगजानन उवाच -

सम्यग्व्यवसिता राजन्मतिस्ते नुग्रहान्मम ।

शृणु गीतां प्रवक्ष्यामि योगामृतमयीं नृप ।। 6 ।।

अर्थ - श्रीगजानन म्हणाले, हे राजन् माझ्या अनुग्रहामुळे तुझी बुद्धि योग्य मार्गाला लागली असल्याने योगामृतरूपी गीता मी तुला सांगतो ती श्रवण कर.

विवरण-आता बाप्पा स्वत: आपल्याला गीता सांगणार म्हणजे आपण कोणीतरी श्रेष्ठ आहोत, आपण बाप्पांचे महान भक्त असल्याने आपल्याला बाप्पांच्याकडून गीता ऐकायला मिळणार असा अहंकार राजाला होण्याची शक्यता बाप्पांच्या लक्षात आल्याने त्याचा तो गैरसमज दूर व्हावा यादृष्टीने बाप्पांनी सांगितलं की, गीता ऐकावी अशी तुला झालेली इच्छा माझ्याच कृपेनं झालेली आहे हे लक्षात घे.         क्रमश:

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article