भाजप आमदारांमध्ये धाकधुक
मुंबईत एकीकडे ऑक्टोबर हिटच्या तडाख्याने नागरिक हैराण झालेले असताना, दुसरीकडे अमित शहा यांच्या मुंबई भेटीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीत पक्षांर्तगत मतभेद तसेच हेवेदावे करण्यास सुरूवात झाली आहे. भाजपच्या काही आमदारांचा विधानसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी होणार असून अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळ्णार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपच्या विद्यमान आमदारांची धाकधुक चांगलीच वाढली आहे.
नवरात्रीत एकीकडे नवरंगाचा उत्सव सुरू असताना, दुसरीकडे मात्र राजकारण्यांनी योग्य संधी साधत राजकीय रंग दाखविण्यास सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईत भाजपला केवळ एकमेव हक्काची आणि सुरक्षित असलेली उत्तर मुंबईची जागा राखता आली, अन्य दोन जागांवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर झालेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतही शिवसेनेने भाजपला धोबीपछाड दिला. परवा झालेल्या मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीतही शिवसेनेने 10 पैकी 10 जागा मिळविताना मुंबईत आपले अस्तित्व कायम असल्याचे दाखवून दिले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला कोणत्याही परिस्थितीत नामोहरम करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे.
लोकसभा निवडणुकीत ज्या भाजपच्या आमदारांना महायुतीच्या उमेदवाराला लिड देता आली नाही किंवा जे उमेदवार आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याची शक्यता कमी आहे, असे भाजपचे आमदार भारती लव्हेकर, कॅप्टन तामीळ सेल्वन यांना नारळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. केवळ काठावरचे मताधिक्य मिळवून दिले आहे, आणि दोन टर्म आमदार असलेले काही आमदार देखील डेंजर झोनमध्ये असून विलेपार्ले येथील भाजपचे आमदार पराग अळवणी यांच्याच मतदार संघात भाजपचे मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे पराग अळवणी यांच्या उमेदवारीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, गोरेगावच्या आमदार आणि माजी राज्यमंत्री विद्या ठाकुर यांच्या उमेदवारीबाबतही साशंकता असून ठाकुर यांनी 2014 ला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा पराभव केल्याने त्या जाएंट किलर ठरल्या होत्या. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागली होती, आता त्यांच्या जागी भाजप खांदेपालट करणार असल्याची चर्चा आहे. दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी यांच्या उमेदवारीबाबत देखील साशंकता आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर किंवा राजकीय वैमनस्यातुन हत्या झालेले त्यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यास येथे सहानुभुतीची लाट बघता भाजपच्या उमेदवाराला फटका बसू शकतो. त्यामुळे मनिषा ताईंना पुन्हा उमेदवारी मिळणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपसाठी सर्वात सुरक्षित असलेला मतदार संघ म्हणजे बोरीवली विधानसभा हा मतदार संघ म्हणजे भाजपचा फिरता चषक किंवा एकप्रकारे भाजपची विधानपरिषदेची उमेदवारी सुध्दा म्हणता येईल, हा मतदारसंघ म्हणजे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवाराची घोषणा करायची आणि थेट निकालाच्या दिवशी विजयाची मिरवणूक काढायची इतका सेफ आणि सुरक्षित मतदार संघ भाजपसाठी दुसरा नाही. या मतदार संघातून 2014 ला विनोद तावडे यांनी प्रतिनिधीत्व केले होते, मात्र 2019 ला तावडे यांचा पत्ता कट कऊन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी येथून सुनिल राणे यांना उमेदवारी जाहीर झाली.
आता या मतदार संघातून अनेक जण इच्छुक असून गेली देन वर्षे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर या मतदार संघात भव्य दिव्य दांडीयाचे आयोजन करत आहेत. यावर्षी देखील दरेकर यांनी येथे रास रंग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दरेकर 2009 ला मनसेत असताना त्यांनी मागाठाणे येथून निवडणूक जिंकली, मात्र 2014 ला शिवसेनेच्या प्रकाश सुर्वे यांच्याकडून त्यांना पराभवाची धुळ चाखावी लागली, त्यानंतर गेली दोन टर्म विधानपरिषदेवर असलेल्या दरेकर यांना कुठल्याही परिस्थितीत विधानसभेत जायचे आहे. कारण भाजपचे सध्याचे जे मंत्रीमंडळ आहे, त्या मंत्रीमंडळात एकही मंत्री हा विधानपरिषद आमदार नाही, सर्वच्या सर्व विधानसभेतून निवडून आले असल्याने दरेकर यांना विधनासभेत जाऊन मंत्री व्हायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा जणू विडा उचलला आहे.
मात्र बोरीवली विधानसभेतून विद्यमान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासाठी राजकीय त्याग करणारे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. दरकेर यांच्यासोबतच भाजपचे प्रसाद लाड आणि मोहीत कम्बोज यांना देखील विधानसभा आमदार व्हायचे असल्याने मोहीत कम्बोज हे वर्सोवा अथवा अंधेरी (प.) या पैकी एका मतदार संघातून तर प्रसाद लाड हे सायन कोळीवाडा या मतदार संघातून निवडणूक लढू शकतात, कारण या मतदार संघातील भाजपचे आमदार कॅप्टन तामीळ सेल्वन यांच्या मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना 9 हजाराचे मताधिक्य आहे. भाजपचे मुंबईतील बहुतांश आमदार हे दोन टर्म झालेले आहेत, त्यातच लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दोन जागा अॅड. उज्ज्वल निकम आणि गुजराती बहुल मतदार असलेली मुंबई उत्तर पूर्व येथे मिहीर कोटेचा यांचा झालेला पराभव हा धक्कादायक मानला जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांना हातात कमळ ऐवजी नारळ मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल बघता भाषिक समीकरणे आणि मतांचे ध्रुवीकरण महत्त्वाचे ठरले आहे. याचा देखील आगामी उमेदवारी देताना भाजप विचार करणार हे नक्की. भाजपच्या विद्यमान आमदार असलेल्या काही जणांचे वय झाले आहे, दुसरीकडे नवीन चेहऱ्याना संधी मिळत नाही. त्यामुळे आता जुन्या चेहऱ्यान्ंाा लोक स्विकारतील का? हा भाजपसमोरील मोठा प्रश्न आहे. भाजपच्या विद्यमान आमदारांना स्थानिक पातळीवर पक्षांर्तगत विरोध देखील वाढत आहे हा विरोध वाढत आहे की? जाणुन बुजुन वाढवला जात आहे, हे मात्र उमेदवारी यादी आल्यावरच कळेल, एक मात्र नक्की विधानसभा निवडणूक ही मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट आहे. भाजपला कोणत्याहीं परिस्थितीत मुंबई महापालिकेत उध्दव ठाकरे यांना अस्मान दाखवून भाजपचा पहिला महापौर बसवायचा आहे, त्यामुळे भाजप अनेक आमदारांना धक्कातंत्र देणार हे नक्की.
प्रवीण काळे