गांजा पुरवठ्याचे आंतरराज्य रॅकेट उद्ध्वस्त
बेळगाव पोलिसांकडून 9 जणांना अटक : 50 किलोहून अधिक गांजा जप्त
बेळगाव : बेळगाव पोलिसांनी अमलीपदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांची पाळेमुळे उखडून काढण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी नऊ जणांना अटक करून 50 किलो 452 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. बेळगावला गांजा पुरवठा करणाऱ्या इस्माईल ऊर्फ सद्दाम याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या असून मध्यप्रदेश व ओडिशातून बेळगावला मोठ्या प्रमाणात गांजा पुरवठा होत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस, सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर आदी अधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी बेळगावला गांजा पुरवठा करणाऱ्या मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्याबद्दल पोलीस पथकाचे कौतुक केले असून त्यांना रोख बक्षीस जाहीर केले आहे.
5 किलो गांजासह अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या जबानीतून महिन्याभरात 50 किलोहून अधिक गांजा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून 50 किलो 452 ग्रॅम गांजा, 13 मोबाईल संच, दोन कार, एक मोटारसायकल, कोयता, सर्जिकल ब्लेड आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी या टोळीकडून वजन मशीनही ताब्यात घेतली आहे. सद्दाम ऊर्फ इस्माईल सय्यद हाच मास्टरमाईंड असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. इस्माईल ऊर्फ सद्दाम बाबू सय्यद, ताजिर गुडूसाब बस्तवाडे दोघेही राहणार कणगला, ता. हुक्केरी, प्रथमेश दिलीप लाड राहणार महागाव, ता. गडहिंग्लज, तेजस भीमराव वाजरे, राहणार कणगला, ता. हुक्केरी, शिवकुमार बाळकृष्ण असबे, राहणार महागाव, ता. गडहिंग्लज, रमजान दस्तगीर जमादार, राहणार कणगला, ता. हुक्केरी, सध्या राहणार कोरेगाव, जि. सातारा, ताजिब अब्दुलरझाक मुल्ला, राहणार मल्लापूर पीजी, सध्या राहणार चिकोडी, अनुराग उदयकुमार यरनाळकर, राहणार संकेश्वर, अब्दुलमजीद अब्दुलसत्तार मुकादम, राहणार मुंबई अशी अटक करण्यात आलेल्या नऊ जणांची नावे आहेत.
सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे, एल. एस. चिनगुंडी, व्ही. एन. बडवण्णावर, एल. एस. आज्जप्पन्नावर, एन. जे. मादार, एम. डी. यादवाड, मारुती कोन्यागोळ, के. एम. निगदी, गंगाधर ज्योती, यासीन नदाफ, सी. बी. दासर, अजिंक्य जबडे, उद्यमबागचे टी. बी. कुंचनूर, कॅम्पचे जे. एस. लमाणी, टिळकवाडीचे सतीश गिरी, खडेबाजारचे संतोष बरगी यांच्यासह तांत्रिक विभागाचे रमेश अक्की व महादेव काशिद आदींनी ही कारवाई केली असून पोलीस आयुक्तांनी या पथकातील अधिकारी व पोलिसांना रोख रक्कम जाहीर केली आहे. मुख्यमंत्री पदकासह इतर पुरस्कारांसाठी त्यांची शिफारस करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. गेल्या चार वर्षांपासून सद्दाम ऊर्फ इस्माईल सय्यद हा बेळगावला गांजा पुरवठा करत आहे. मध्यप्रदेश व ओडिशातून गांजा मागवून केवळ बेळगाव शहरच नव्हेतर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात, हुबळी-धारवाड, बेंगळूर व गोव्यातही तो पुरवठा करतो. हुबळी-धारवाड व पुणे येथेही त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मध्यप्रदेश व ओडिशातून गांजा पुरवठा केला जात असल्याचे उघडकीस आले. गांजाचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुणे व मुंबई येथून हेरॉईन पुरवठा केला जात असल्याचे उघडकीस आले असून त्याचीही पाळेमुळे खणण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.