आंतरराज्य महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
इंडी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील महामार्ग 548 वरील परिस्थिती : वाहनधारकांना अडचणी
वार्ताहर/विजापूर
इंडी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरून जाणाऱ्या 548 (बी) राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. सदर मार्गाचे काम सुर असल्याने सदर मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरल्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत असून सदर मार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. इंडी तालुक्यातील नागरिक जे भविष्यात जिल्हा केंद्र होण्याची आशा बाळगतात. राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे खूपच खराब अनुभव घेत आहेत. कारण राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा वेग काही ठिकाणी अत्यंत मंदगतीने सुरू आहे. तसेच काही ठिकाणी कामामध्ये सुरळीतपणा नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांतून आरोप करण्यात येत आहेत की, सदर कामाची योजना योग्य प्रकारे राबवली जात नाही. विजापूर तालुक्यातील नागठाण गावातून सुरू झालेले राष्ट्रीय महामार्गाचे काम इंडी तालुक्यातील अगरखेड क्रॉसपर्यंत सुरू आहे आणि रुगी गावापासून इंडी शहरात जाणाऱ्या रस्त्याचे काम मंदगतीने व अव्यवस्थितपणे सुरू आहे. तसेच, काही ठिकाणी रस्ता खोदून सोडला आहे आणि प्रवाशांना योग्य मार्गदर्शन करण्यात आलेले नाही. या व्यतिरिक्त, रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडले आहेत. ज्यामुळे दुचाकीस्वारांना इजा होऊ शकते. रस्त्यावर नियमितपणे पाणी शिंपडून धूळ टाळली पाहिजे. मात्र, दुर्लक्ष केल्यामुळे धुळीचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.