वाहने चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
60 लाख ऊपये किंमतीची वाहने जप्त
कोल्हापूर
दुचाकी व चारचाकी वाहने चोरणाऱ्या एका आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले. यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार नागेश हणमंत शिंदे (वय 30, रा. लोकमान्यनगर, कोरोची, ता. हातकणंगले), गुन्हेगार संतोष बाबासो देटके (वय 40, रा. तारळे, ता. पाटण, जि. सातारा), मुबारक खादरी उर्फ करीम शरीफ शेख (वय 64, रा. पी. एच. कॉलनी, टुमकूर, जि. बेंगलोर), मोहम्मद सुफी उर्फ मुस्तफा सुपे महंमद (वय 50, रा. सेकंड क्रॉस, जनता कॉलनी, टुमकूर, जि. बेंगलोर), इमामसाब रसुलसाब मुलनवार (वय 45, रा. कुरटपेटी बेटगिरी, जि. गदग) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पाच दुचाकी, सात चारचाकी अशी 60 लाख रूपये किंमतीची 12 वाहने जप्त केली आहेत, अशी माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी बुधवारी दिली.
याबाबत पोलीस निरीक्षक कळमकर म्हणाले, जिह्यात वाहन चोरीच्या जेथे घटना घडत आहेत. त्या ठिकाणी भेटी देऊन आणि पोलीस रेकॉर्डवरील वाहन चोरीच्या गुन्हेगारांची चौकशी करून, वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून, वाहन चोरीच्या गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू होता. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार राम कोळी, सुरेश पाटील यांना नागेश शिंदे हा चोरीचा टेम्पो घेऊन शिवाजी विद्यापीठ ते सरनोबतवाडी रस्त्यावरील जलसंपदा कार्यालयाच्या गेटजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सापळा लावून पोलिसांनी शिंदे आणि त्याचा साथिदार संतोष देटके यांना टेम्पोसह रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता टेम्पो पुलाची शिरोली परिसरातून चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी मुबारक खादरी उर्फ करीम शेख, मोहम्मद सुफी उर्फ मुस्तफा सुपे महंमद, इमामसाब मुलनवार यांच्या मदतीने पाच दुचाकीची आणि सहा चारचाकी वाहनांची चोरी केल्याची माहिती दिली. त्यावरून मुबारक खादरी, मोहम्मद सुफी यांना बेंगलोर येथून अटक केली. तर मुलनवारला कागल नजीकच्या लक्ष्मी टेकडी येथून अटक केली. या सर्वांकडून चोरीच्या पाच दुचाकी आणि सात चारचाकी अशी 60 लाख रूपये किंमतीची वाहने जप्त केली.
चौकट
पोलीस ठाणे वाहन
पुलाची शिरोली औद्योगिक वसाहत - टेम्पो
राजारामपुरी पोलीस ठाणे - कार
जयसिंगपूर पोलीस ठाणे - कार
कुऊंदवाड पोलीस ठाणे - टेम्पो
शिरोळ पोलीस ठाणे - कार आणि दुचाकी
शहापूर पोलीस ठाणे - टेम्पो आणि दुचाकी
शाहूपुरी पोलीस ठाणे - दुचाकी
कागल पोलीस ठाणे - दुचाकी
गांधीनगर पोलीस ठाणे - दुचाकी
कुर्डुवाडी (जि. सोलापूर) - टेम्पो
दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून - पाच दुचाकी आणि सात चारचाकी चोरल्या
वाहन चोर शिंदेविरोधी 90 गुन्हे
वाहन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील नागेश शिंदे याच्याविरोधात दुचाकी व चारचाकी वाहन चोरीचे तब्बल 90 गुन्हे दाखल आहेत. संतोष देटके विरोधात चारचाकी चोरीचे सहा गुन्हे आणि मुबारक खादरी उर्फ करीम शेख विरोधात चोरीची वाहने विकत घेतल्याबाबत चार गुन्हे दाखल आहेत.
कारवाईत याचा सहभाग
या कारवाईत पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, महेश खोत, ऊपेश माने, रोहित मर्दाने, विनोद कांबळष, संजय पडवळ, अमित सर्जे, संजय कुंभार, सुशिल पाटील, राजेंद्र वरंडेकर आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सचिन बेंडखेळे, सुरेश बाबर, मिनाक्षी पाटील यांचा सहभाग होता.