For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दरड हटविण्यात व्यत्यय,एकूण सात मृतदेह हाती

11:19 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
दरड हटविण्यात व्यत्यय एकूण सात मृतदेह हाती
Advertisement

शिरूरमधील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेतील अद्याप तिघांचा शोध जारी : खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरचा वापर बंद

Advertisement

कारवार : अंकोला तालुक्यातील शिरुर येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर कोसळलेली दरड हटविण्याचे आणि दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली सापडलेल्यांचा शोध घेण्याची मोहीम शनिवारी पाचव्या दिवशीही सुरू ठेवण्यात आली होती. दुर्घटनास्थळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरड हटविण्याच्या कार्यात फार मोठा व्यत्यय येत आहे. दुर्घटनेनंतर गंगावळी नदीत काही व्यक्ती वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून बेपत्ता व्यक्तींचा शोध लावण्यासाठी शुक्रवारपासूनच हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार होता. तथापि खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर वापराचा विचार सोडून देण्यात आल्याची माहिती कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळु वैद्य यांनी दिली आहे. दरड कोसळलेल्या डोंगरावरील माती पावसामुळे भलतीच मऊ झाल्याने तेथे आणखीन दरड कोसळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दुर्दैवाने आणखीन दरड कोसळली तर शिरुर येथील परिस्थिती आणखीन चिघळणार आहे. दरड कोसळण्याची घटना गेल्या मंगळवारी घडली होती. त्याच दिवशी चार मृतदेह हाती लागले होते. गुरुवारी आणखीन दोन मृतदेह हाती लागले होते. शुक्रवारी गंगावळी नदीत छिन्नविछिन्न अवस्थेतील अज्ञात पुरुषाचा मृतदेह हाती लागला आहे. अद्याप किमान तीन व्यक्ती बेपत्ता आहेत.

अत्याधुनिक शोध यंत्रणाचा वापर

Advertisement

दरड कोसळल्यानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली जगलबेटहून केरळकडे लाकडाची वाहतूक करणारी ट्रक ढिगाऱ्याखाली अडकल्याची दाट शक्यता घटनेच्या पहिल्या दिवसापासून व्यक्त केली जात आहे. ट्रकचा शोध घेण्यासाठी अगोदर मेटल डिटेक्टर आणि आडा सुरतकल येथील एनआयटी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रडार यंत्रणेचा वापर करण्यात आला. तथापि मातीचा ढिगारा चिखलमय झाल्याने दोन्ही यंत्रणा उपयोगी ठरल्या नाहीत, असे सांगण्यात आले.

घटनास्थळी जमावबंदीचा आदेश

दरड कोसळलेल्या जागेपासून काही कि.मी. च्या अंतरापर्यंत जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यामुळे घटनास्थळापर्यंत पत्रकारांनाही जाऊ देण्यात आले नाही. ही बाब पत्रकारांनी कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल यांच्या नजरेला आणून दिली असता सैल भलतेच भडकले आणि त्यांनी जमावबंदी कशासाठी, असा प्रश्न तेथे उपस्थित असलेल्या जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे केला. इतकेच नव्हेतर त्यांनी पत्रकारांना घटनास्थळापर्यंत नेले. पुढे त्यांनी मला अटक करून दाखवा, असे आवाहन केले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची गोची झाली. यावेळी सतीश सैल आणि पालकमंत्री वैद्य यांच्या दरम्यान शाब्दिक चकमकी झाल्या.

पिडितांना आयआरबीनेच भरपाई द्यावी

शिरुर येथील दुर्घटना आयआरबी बांधकाम कंपनीच्या चुकीच्या आणि वैज्ञानिक बांधकामामुळेच झाली आहे. त्याकरीता दुर्घटना पिडीतांना कंपनीनेच नुकसान भरपाई दिली पाहिजे. तथापि सदर कंपनी पिडीतांकडे पहायला तयार नाही, असा आरोप मंत्री वैद्य यांनी केला.

मुख्यमंत्री आज शिरुरला भेट देणार

रविवार दि. 21 रोजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे शिरूर येथील दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहेत. शिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष यजुवेंद्र येडीयुरप्पा आणि प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री आर. व्ही. देशपांडेही रविवारीच घटनास्थळी भेट देणार आहेत.

कारवार जिह्यातील कॅसलरॉक येथे सर्वाधिक पावसाची नोंद

रामनगर कारवार जिह्यातील जोयडा तालुक्यातील येणाऱ्या कॅसलरॉक या गावाला दुसरे चेरापुंजी नावाने संबोधले जाते. सध्या पावसाळा सुरू झाल्यापासून या ठिकाणी 30836.4 मि. मी. ची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यात 19.4 मि. मी. तर मे महिन्यात 110 मि. मी. तर जून महिन्यात 1135.2 मि. मी. व जुलै महिन्यातील वीस तारखेपर्यंत 2571.2 मि. मी. ची नोंद झाली आहे. तर जुलै महिन्याच्या 18 तारखेला 241.4 मि. मी. पाऊस होऊन सर्वाधिक पाऊस त्या दिवशी पडला आहे. या भागातील नदी-नाले भरले असून खेड्यापाड्यातील गावातील संपर्क तुटला आहे. तर झाडांचीही पडझड चालू आहे.

Advertisement
Tags :

.