For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यातील 1 लाख 87 मतदार वगळले : गोयल

06:15 AM Dec 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्यातील 1 लाख 87 मतदार वगळले   गोयल
Advertisement

सुनावणी घेऊन मॅपिंग न झालेल्या मतदारांचा अंतिम निर्णय होणार : - राज्यातील मतदान केंद्रांची संख्या वाढवली

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील मतदारांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) झाली असून, या मसुदा यादीतून सुमारे 1 लाख 78 मतदार वगळण्यात आलेले आहेत. 11 डिसेंबर अखेरपर्यंत 10 लाख 84 हजार 956 (91.55 टक्के) मतदारांचे एन्युमरेशन अर्ज संकलित करून त्यांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आलेले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी दिली.

Advertisement

राज्यातील मतदारांच्या विशेष फेरतपासणीचा अहवाल सादर करताना मुख्य निवडणूक अधिकारी गोएल यांनी पत्रकार परिषदेत मसुद्यातील फेरबदलाची माहिती दिली. ते म्हणाले की, सुमारे 1 लाख 82 हजार 855 मतदारांचे (8.45 टक्के) अथवा त्यांच्या आई-वडिलांचे नाव 2002 च्या मतदार यादीत नाही. अशा मॅपिंग न झालेल्या मतदारांबाबत थोडा दिलासा देण्यात आला आहे. अशा मॅपिंग न झालेल्या मतदारांबाबत  सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

सर्व कागदपत्रे योग्य असल्यास यादीत पुन्हा समावेश

राज्यात मतदार फेरतपासणी करण्यासाठी देण्यात आलेले अर्ज परत न आल्याने 1 लाख 78 मतदारांचा ‘एएसडीडी’ (गैरहजर, स्थलांतरित किंवा मृत) या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.  यामध्ये मृत, पत्त्यावर अनुपस्थित राहिलेले, दुहेरी नावांचा समावेश असणे अथवा पत्ता कायमचा बदलला असलेल्या मतदारांचा समावेश आहे. 16 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या मसुदा यादीत या मतदारांचे नाव असणार नाही. अशा मतदारांची नावे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने जाहीर केली जातील. यातील कुणाला आपले नाव चुकीच्या पद्धतीने काढले आहे असे वाटल्यास त्यांनी अर्ज भरून देणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींना घोषणापत्रही (अॅफेडेव्हीट) द्यावे लागणार आहे. सर्व कागदपत्रे योग्य असतील, तर या व्यक्तींची नावे अंतिम मतदार यादीत पुन्हा समाविष्ट केली जातील,  असेही मुख्य निवडणूक अधिकारी गोयल यांनी सांगितले.

पुन्हा पाठविण्यात येणार नोटिसा

राज्यात यापूर्वी 2002 मध्ये मतदार फेरतपासणी (एसआयआर) करण्यात आले होते. 2002 आणि 2025 च्या मतदार याद्यांची पडताळणी केली असता सुमारे 1 लाख 82 हजार 855 मतदारांचे मॅपिंग झालेले नाही. याचाच अर्थ, या मतदारांचे अथवा त्यांच्या आई किंवा वडिलांचे नाव 2002 च्या मतदार यादीत नाही. या सर्व लोकांचे नाव मसुदा यादीत असेल. त्यांना 16 ते 20 डिसेंबर दरम्यान नोटिसा पाठवण्यात येतील. यासाठी सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल.

सध्याची आकडेवारी अशी :

1) राज्यात एकूण मतदार :  11 लाख 85 हजार 34

2) संकलित झालेले एन्युमरेशन फॉर्म  : 10 लाख 84 हजार 956

3) मॅपिंग न झालेले मतदार : 1 लाख 82 हजार 855

4) मृत मतदार : 25 हजार 574

5) कायमस्वरूपी पत्ता बदलले मतदार : 40 हजार 473

6) अनुपस्थित मतदार : 29 हजार 750

7) दुहेरी मतदान : 2008

8) फॉर्मवर सही नसणे व अन्य कारणे : 2273 मतदार

अशी वाढली मतदान केंद्रे

मतदार केंद्रांची संख्या वाढल्याने याबाबतची माहिती देताना मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल म्हणाले की, एसआयआर (विशेष सखोल फेरतपासणी) प्रक्रियेनंतर राज्यातील दोन्ही जिह्यातील मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली. त्यामध्ये उत्तर गोव्यात 1 आणि दक्षिण गोव्यात 7 मतदान केंद्रे वाढवली आहेत, तर दक्षिणेतील 2 मतदान केंद्रे बंद करण्यात आली आहेत. यामुळे आता राज्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या सहाने वाढून 1731 इतकी झाली आहे. या मतदान केंद्रांच्या संख्येच्या बदलाबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कल्पना देण्यात आली आहे, असेही संजय गोयल म्हणाले.

Advertisement
Tags :

.