For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवकांना सक्षम करणारी इंटर्नशिप योजना

06:31 AM Oct 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
युवकांना सक्षम करणारी इंटर्नशिप योजना
Advertisement

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत आतापर्यंत 280 कंपन्यांनी नोंदणी केली असल्याचे पाहायला मिळाले आहे. या नोंदणीच्या माध्यमातून जवळपास 1 लाख 27 हजार इंटर्नशिपच्या संधी उमेदवारांना दिल्या जाणार आहेत. देशातील कंपन्यांना पंतप्रधानांनी या इंटर्नशिप योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे आत्तापर्यंत 280 कंपन्यांनी इंटर्नशिप योजनेमध्ये सहभाग नोंदवला आहे. कॉर्पोरेट आणि इतर उद्योजकांसाठी 3 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान इंटर्नशिप योजना खुली करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 12 ऑक्टोबरपासून युवकांनी नोंदणी करण्यास सुरुवात केली होती. ही नोंदणी नोव्हेंबरमध्ये सुरुवातीच्या काही दिवसापर्यंत सुरू राहणार असल्याचे समजते.

Advertisement

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत कार्य पाहात आहे. भारतीय युवकांना औद्योगिक क्षेत्रातील प्रशिक्षणाचा अनुभव मिळावा हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे. या माध्यमातून सदरच्या युवकांना भविष्यात अनेक संधींची, रोजगाराच्या संधींची द्वारे खुली होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त औद्योगिक प्रशिक्षण फार महत्त्वाचे असून या दोन्हीतील अंतर कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाचे कार्य करेल असे म्हटले जात आहे. शिक्षणासोबतच औद्योगिक शिक्षण प्रशिक्षणाची गरज सुद्धा आजच्या युवकांना जरुरीची असल्याचे अलीकडच्या काळात दिसून आले आहे. हीच गरज लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या युवा तरुणांसाठी पंतप्रधान इंटर्नशिप योजना अंमलात आणली आहे. तंत्रज्ञान, निर्मिती, वित्त, रिटेल, आरोग्य आणि संबंधित क्षेत्र व इतर क्षेत्रांमध्ये युवकांना इंटर्नशिप करता येणे शक्य होणार आहे.

सरकारला येणाऱ्या काळामध्ये आजच्या तरुणाईला रोजगारासाठी सर्वार्थाने सक्षम करायचे आहे. युवकांमध्ये जास्तीत जास्त कौशल्य वाढवण्याचाही सरकारचा प्रयत्न असणार आहे. विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या मागणीनुसार युवकांना योग्य त्या रोजगार संधी उपलब्ध होणे यासाठी पंतप्रधान इंटर्नशिप योजना ही महत्त्वाचा पैलू ठरू शकते. भारतात सध्याच्या घडीला इतर देशांच्या तुलनेत युवकांची लोकसंख्या ही अधिक आहे. पदवीनंतर युवकांना लगेचच नोकरीच्या संधी पटकन उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अशा युवकांनी इंटर्नशिपच्या माध्यमातून शिक्षण-प्रशिक्षणाचा औद्योगिक क्षेत्रातला अनुभव घेणे जरुरीचे असणार आहे. सरकारच्या या इंटर्नशिप उपक्रमामध्ये दिग्गज कंपन्यांनी आपणहून सहभाग नोंदवला आहे हे विशेष. यामध्ये महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, लार्सन आणि टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, ओएनजीसी, बजाज फायनान्स, आयशर मोटर्स, मॅक्सलाइफ इन्शुरन्स, मुथूट फायनान्स आणि जुबिलंट फूड यासारख्या दिग्गज कंपन्यांनी भाग घेतला आहे. तेल, वायू ऊर्जा, ऑटोमोटिव्ह, ट्रॅव्हल आणि हॉस्पिटलिटी, बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस तसेच मेटल्स व मायनिंग यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये लोकांना रोजगार संबंधित शिक्षण-प्रशिक्षण प्राप्त करता येणार आहे. औद्योगिक उत्पादनासोबतच पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्र तसेच माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर विकासाच्या संबंधातही व एफएमसीजी आणि दूरसंचार क्षेत्रातही युवकांना इंटर्नशिपची संधी प्राप्त करून देण्यात आली आहे.

Advertisement

इंटर्नशिपची संधी सध्याला 37 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह 737 जिह्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या इंटर्नशिप अंतर्गत युवकांना 5 हजार रुपये प्रति महिना आणि 6 हजार रुपये एक वेळ ग्रँट स्वरूपात मिळणार आहेत. या पायलट प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 800 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या अंतर्गत 1.25 लाख इंटर्नशिप युवकांना दिली जाणार आहेत. आर्थिक वर्ष 2025 मध्ये हे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून 21 ते 24 वयोगटातील युवकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अटीनियमानुसार इंटर्नशिपसाठी युवकांची निवड केली जाते.

Advertisement
Tags :

.