फर्मागुडीत उद्या घुमणार सनातन शंखनाद
आंतरराष्ट्रीय हिंदू धर्मसभेचे आयोजन : 15 देशांतील 25 हजार हिंदू जमणार,जागतिक हिंदू नेत्यांचीही उपस्थिती
- सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजन
- फर्मागुडीत सजली आध्यात्मिक-आधुनिक नगरी
- तब्बल 16 हजार प्रतिनिधींसाठी निवास व्यवस्था
- दिमतीला 4500 चार चाकी, तर 650 बसेस
- अखंड वीज पुरवठ्यासाठी 38 जनरेटर्सची सज्जता
- पंधरा स्वामींच्या पादुका ठेवणार दर्शनासाठी
पणजी : सनातन संस्थेतर्फे गोव्यात देशातील पहिली महाकाय हिंदू परिषद उद्या शनिवार दि. 17 मे पासून सुरू होत आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमाला ‘शंखनाद महोत्सव’ असे नाव दिलेले असून या निमित्ताने पंधरा राष्ट्रांतील आणि देशभरातील मिळून 25,000 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. याशिवाय दररोज दहा हजार नागरिक त्यात सहभागी होतील. फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 1 लाख 26 हजार चौरस मीटर क्षेत्रफळात भव्य अशी नगरी उभी राहिलेली आहे. यात सहभागी होण्यासाठी योगाचार्य रामदेवबाबा तसेच श्री श्री रविशंकर, परमपूज्य गोविंद गिरी महाराज तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी अनेक नामवंत मंडळी सहभागी होणार आहेत.
सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव
फर्मागुडीच्या पटांगणावर अनेक कामे सध्या चालू आहेत. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ या नावाने या भव्य दिव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच तयारीसाठी हजारो माणसे सध्या प्रत्यक्षात राबत आहेत. सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक हे अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी बऱ्यापैकी जमवाजमव केली असून त्यातून देश-विदेशातील नामवंत मंडळी या तीन दिवसांच्या परिषदेत सहभागी होत आहेत. सनातन संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या धर्मसभेचे आयोजन केले आहे. सच्चिदानंद जयंत आठवले हे या परिषदेत उद्घाटनच्या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
अवाढव्य तयारी पूर्णत्वाकडे
फर्मागुडी येथे चालू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्षात त्या ठिकाणी भेट दिली असता तेथे भव्य असे असंख्य हँगर्स उभारले जात असल्याचे दिसले. या परिषदेत सहभागी होण्यासाठी गुऊवारी सायंकाळपर्यंत साडेचोवीस हजार प्रतिनिधींनी प्रत्यक्षात नोंदणी केली आहे. आणखी केवळ दीड हजार प्रतिनिधींना त्यात समाविष्ट करून घेता येईल. या परिषदस्थळी जाण्यासाठी तीन प्रवेशद्वारे सर्वसामान्य जनतेसाठी उभारलेली आहेत. अति महनीय व्यक्तींसाठी मागील बाजूने कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये प्रवेशद्वार तयार केले आहे. सर्वसामान्यांसाठी असलेल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर भव्य कमानी उभारल्या असून त्यावर मंदिरांच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत. आसपासच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती पुतळे उभारले जाणार आहेत. प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर भव्य पटांगणामध्ये एक दिव्य असे प्रदर्शन आयोजित केले आहे. त्याच्या मध्यभागी सनातन राष्ट्र ध्वजस्तंभ उभारला आहे. सनातन राष्ट्राचा ध्वज त्यादिवशी अनेक महनीय व्यक्तींच्या हस्ते फडकविला जाणार आहे.
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज
तीन भले मोठे हँगर्स जर्मन पद्धतीने उभारलेले आहेत. मुसळधार पाऊस पडला तरी देखील मंडपात पाण्याचा एकही थेंब येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तिन्ही हँगर्स वातानुकूलित असतील. प्रत्येक हँगर्समध्ये एक डझन मोठ्या क्रीन उभारलेल्या आहेत. 28 हजार खुर्च्या आणलेल्या आहेत. अति महनीय व्यक्तींसाठी स्वतंत्र दोन हँगर्स आहेत. अति महनीय व्यक्तींसाठी ‘रेस्ट रूम’ आहेत. दोन हँगर्समध्ये प्रत्येकी 7000 खुर्च्या बसविल्या जातील. ज्या ठिकाणी उद्घाटन सोहळा होणार आहे त्या मुख्य हँगरमध्ये 11000 खुर्च्या लावण्यात येत आहेत. महोत्सवस्थळी सुरक्षा कंपनीचे 200 सुरक्षा कर्मचारी याशिवाय गोवा पोलिस हेही काम करतील. जे हँगर्स उभारण्यात आलेले आहेत ते देशातील सर्वात मोठे हँगर्स असून त्यांची ऊंदी 30 मीटर पेक्षाही जास्त आहे.
तब्बल 16000 जणांची निवास व्यवस्था
देशाच्या विविध भागातून या ठिकाणी येणाऱ्या प्रतिनिधींना राहण्यासाठी फोंडा तालुका व आसपासच्या परिसरातील मंदिरांची वसतिगृहे तसेच काही हॉटेल्समधून खोल्या आरक्षित केल्या असून त्यातून 16000 जणांची निवास व्यवस्था केली जात आहे. आजपासून मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी गोव्यात येणार आहेत.
4500 चारचाकी तर 650 बसेस
या संमेलनाची व्यापकताच एवढी मोठी आहे की, 16000 प्रतिनिधींना आणण्यासाठी 4500 कार तसेच 650 बसेस असून त्यापैकी 550 बसेस या वातानुकूलित असतील. यातील बऱ्याच गाड्या या गोव्यात उपलब्ध नसल्याने बाहेरून आणाव्या लागल्या आहेत. हे सर्व प्रतिनिधी सकाळी साडेआठपर्यंत मंडप स्थळी पोहोचतील अशी व्यवस्था केली आहे. याशिवाय 150 शटल बससेवा देखील सुरू करण्यात येणार आहे.
अति महनीय व्यक्तींची हजेरी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे सभापती सतीश महाना, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव सहाय आणि उपमुख्यमंत्री देशील येणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, योगगुऊ रामदेवबाबा, श्री श्री रविशंकर, प. पू. गोविंद गिरी महाराज, पद्मश्री ब्रम्हेशानंदाचार्य स्वामी, अन्य अनेक धर्मगुरू या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
26000 जणांची भोजन व्यवस्था
चार हँगर्समध्ये जेवणाखाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी 8 000 व्यक्ती जेवण करू शकतील. मोठे मुदपाक खाने तयार केले असून 30 बल्लव जेवण बनवतील, तर 300 जण त्यांच्या मदतीला असतील. सनातनचे एक हजार कार्यकर्ते दिवस रात्र राबत आहेत. सनातनचे राष्ट्रीय प्रवत्ते अभय वर्तक हे अनेकांकडे भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत असून अनेक कामांचा ते आढावा घेत आहेत. 17 रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटन सोहळा होईल. रामदेवबाबा दि. 18 रोजी सकाळी, तर श्री श्री रविशंकर 19 रोजी या ठिकाणी येणार आहेत. 19 रोजी समारोप होईल. 20 आणि 21 मे रोजी नामवंत ब्राह्मणांच्या उपस्थितीत व गोव्याचे वेदशास्त्रसंपन्न दामोदर वझे यांच्या अधिपत्याखाली शतचंडी उत्सव आयोजित केला आहे. शतचंडीच्या निमित्ताने 61 दांपत्य आणि 20000 जण बसून एक कोटी श्रीरामाचा नाम जप करणार आहेत. महोत्सवात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या तमाम नागरिकांना आधार कार्डाच्या आधारे प्रवेश दिला जाईल, असे वर्तक म्हणाले. कार्यक्रम स्थळी 350 शौचालये उभारण्यात आलेली आहेत.
वीज व्यवस्थेसाठी 38 जनरेटर्स
या ठिकाणी प्रचंड मोठे हँगर्स उभारलेले असून भव्य दिव्य अशा नगरीसाठी किमान 11 मेगावॅट वीज यंत्रणेची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आतापर्यंत 38 मोठे जनरेटर विविध ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत.
15 स्वामींच्या पादुका जनतेसाठी
महोत्सव परिसरात प्रवेशद्वारमधून प्रवेश केल्यानंतर खुल्या पटांगणात एक मोठे प्रदर्शन आयोजित केलेले असून त्याच्या बाह्य परिसरात राष्ट्रध्वज स्तंभ उभारलेला आहे. त्याच्या आजूबाजूला 15 स्वामींच्या पादुका जनतेसाठी दर्शनार्थ ठेवण्यात येणार आहेत. महोत्सव ठिकाणी अनेक दुकाने टाकण्यात येत असून त्यामधून खाद्यपदार्थ, धार्मिक ग्रंथ, धार्मिक कपडे इत्यादींची विक्री केली जाईल. शिवाय बाजूला होणाऱ्या प्रदर्शनात विविध प्रकारचे शंख, अनेक नद्यांमधून वेचून काढलेले विविध आकाराचे दगड, शाळीग्राम हे देखील मांडण्यात येत आहेत. एकूणच सारे प्रदर्शन माहितीपूर्ण असून ते पाहण्यासाठी किमान अडीच तास लागतील. अशा प्रकाराचा हा महोत्सव गोव्यात प्रथमच आयोजित केला जात असून सनातनचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचा 83 वा वाढदिवस देखील दि. 18 रोजी होणार आहे. त्यानिमित्त दिवसभर धर्म परिषद चालणार आहे. फर्मागुडी येथील एक लाख 26 हजार चौरस मीटर क्षेत्रफळात एक मोठी महानगरी उभारली असून अशा तऱ्हेचा हा भव्य दिव्य धार्मिक महोत्सव ही एक गोव्यासाठी ऐतिहासिक घटनाच असावी.