2,350 कोटीतून बेंगळुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी : क्रीडा संकुलाचाही समावेश
बेंगळूर : कर्नाटक गृहनिर्माण मंडळाच्यावतीने बेंगळूरच्या सूर्यनगर चौथा स्टेज येथे समग्र विकास योजनेंतर्गत 75 एकरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि क्रीडा संकूल निर्माण केले जाणार आहे. 2,350 कोटी रुपये खर्चातून ही योजना राबविण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान यांनी दिली.
गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बेंगळूरमध्ये आणखी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम निर्माण करण्यात येणार आहे. ही एक महत्त्वाची योजना आहे. येथे स्टेडियममध्ये 80 हजार प्रेक्षक आसन क्षमतेची सुविधा असेल. 24 विविध इनडोअर आणि आऊटडोअर क्रीडांगणही निर्माण केले जाईल. देशातील सर्वात मोठ्या क्रीडांगणामध्ये याचा समावेश होणार आहे.
सदर योजनेचा प्रस्ताव 8 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तयार करण्यात आला होता. आता मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मांडून त्यावर दीर्घ चर्चा करण्यात आली. त्यानंतर तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे, असेही मंत्री जमीर अहमद खान यांनी सांगितले.