काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध : विकासाकडे दुर्लक्ष, खासदार जगदीश शेट्टर यांचा आरोप
बेळगाव : राज्यात मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. मुख्यमंत्रीपदी आपल्याच गटाचा सदस्य रहावा, यासाठी दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. परंतु या सर्व घडामोडींमुळे राज्यातील विकास पूर्णत: ठप्प झाला आहे. राज्याच्या प्रगतीपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांना पदांमध्येच जास्त रस असल्याचा आरोप खासदार जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील शीतयुद्ध आता उघडपणे दिसून येत आहे. यामुळे सरकारमध्येच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील सर्वसामान्यांकडे पाहण्यास मंत्री, नेत्यांना वेळ नाही. त्यामुळे अनेक विकासप्रकल्प पूर्णत: ठप्प झाली आहेत. त्यामुळे सरकार चालविण्यास काँग्रेस पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे ऊस दरवाढीसाठी शेतकरी, अंगणवाडी सेविका, विविध कामगार संघटना आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत असताना दुसरीकडे सरकार मात्र डोळेबंद करून सरकार चालविले जात आहेत. राज्यात भ्रष्टाचार वाढला असून योजनांना निधी कमी पडत आहे. काँग्रेसने जनतेचा विश्वासघात केला असून केवळ सत्तेसाठी हे सुरू असल्याचा घाणघाती आरोप शेट्टर यांनी केला. यावेळी माजी आमदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, महानगर अध्यक्षा गीता सुतार, अॅड. एम. बी. जिरली यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.