लॉर्ड्स कसोटीत रंजक ट्विस्ट, इंग्लंडचा पलटवार
टीम इंडियाला विजयासाठी 135 धावांची गरज : चौथ्या दिवशी 4 बाद 58 धावा :
वृत्तसंस्था/ लॉर्ड्स
अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवशी 4 गडी गमावत 58 धावा केल्या आहेत. यामुळे आता पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 135 धावांची गरज आहे. तर इंग्लंडनेही जोरदार कमबॅक केले असून त्यांनाही विजयासाठी केवळ 6 विकेट्सची गरज आहे. यामुळे आता पाचव्या दिवशी कोण बाजी मारणार, याची उत्सुकता असेल. दिवसअखेरीस केएल राहुल धावांवर खेळत होता.
ऐतिहासिक लॉर्ड्सवर खेळवण्यात येत असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडने 387 धावा केल्या. यात जो रूटने शतक पूर्ण केले. तर भारताकडून बुमराहने 5 विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या 387 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने 387 धावा केल्या. यामध्ये केएल राहुलने शानदार शतक झळकावले. विशेष म्हणजे, यावेळी कोणत्याही संघाला आघाडी घेतला आली नाही. यानंतर तिसऱ्या दिवसअखेरीस इंग्लंडने बिनबाद 2 धावा केल्या होत्या. याच धावसंख्येवरुन चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा इंग्लडची सुरुवात चांगली झाली नाही.
सुंदर, बुमराहची जबरदस्त गोलंदाजी
इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट 12 धावांवर बाद झाला. बेन डकेटच्या रूपात इंग्लडला पहिला झटका बसला. त्यांनतर सिराज त्यावरच थांबला नाही तर त्याने ऑली पोपला 4 धावांवर बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. इंग्लंडच्या 42 वर 2 विकेट गेलेल्या असताना इंग्लंडला झॅक क्रॉलीच्या रूपात तिसरा झटका बसला. त्याला 22 धावांवर नीतिश कुमार रे•ाrने यशस्वीद्वारे झेलबाद केले. क्रॉलीनंतर मैदानात आलेला हॅरी ब्रुक चांगल्या लयीत दिसत असताना त्याला आकाश दीपने 23 धावांवर त्रिफळाचित केले. त्यामुळे इंग्लंडने लंचब्रेकपर्यंत 4 गडी गमावून 98 धावा केल्या होत्या. यानंतर फलंदाजीला आलेला अनुभवी जो रुट आणि युवा फलंदाज जेमी स्मिथही फार काळ मैदानात टिकले नाहीत. रुटने 96 चेंडूचा सामना करताना 1 चौकारासह 40 धावा फटकावल्या तर स्मिथने 8 धावांचे योगदान दिले. एका अप्रतिम स्पेलवर रुटला वॉशिंग्टनने बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. स्मिथही सुंदरच्या गोलंदाजीवर बाद झाला. चहापानानंतर इतर इंग्लिश फलंदाजही फार काळ मैदानात टिकले नाहीत. त्यांचा दुसरा डाव 62.1 षटकांत 192 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 4 तर बुमराहृ सिराजने प्रत्येकी दोघांना तंबूचा रस्ता दाखवला.
टीम इंडियाला 193 धावांचे टार्गेट
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला दुसऱ्याच षटकांत धक्का बसला. सलामीवीर यशस्वी जैस्वालला भोपळाही फोडता आला नाही. नंतर, केएल राहुल आणि करुण नायर यांनी डांव सावरण्याचा प्रयत्न केला, पण नायरला 14 धावांवर कार्सेने पायचीत केले. कार्सेनेच शुभमन गिलला (6) तंबूचा रस्ता दाखवला. नाईट वॉचमन म्हणून आलेला आकाशदीपही 1 धावा करुन माघारी परतला. यानंतर दिवसअखेरीस इंग्लंडने 4 बाद 58 धावा केल्या होत्या, भारतीय संघाला आता विजयासाठी 135 धावांची गरज आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव 387 आणि दुसरा डाव 62.1 षटकांत सर्वबाद 192 (जॅक क्रॉली 22, बेन डकेट 12, ऑली पोप 4, जो रुट 40, हॅरी ब्रूक 23, बेन स्टोक्स 33, ख्रिस वोक्स 10, वॉशिंग्टन सुंदर 4 बळी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह प्रत्येकी 2 बळी, नितीश कुमार रे•ाr, आकाशदीप प्रत्येकी 1 बळी).
भारत पहिला डाव 387 आणि दुसरा डाव 17.4 षटकांत 4 बाद 58 (यशस्वी जैस्वाल 0, केएल राहुल खेळत आहे 33, करुण नायर 14, शुभमन गिल 6, आकाशदीप 1, कार्से 2 बळी, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स प्रत्येकी 1 बळी).
वॉशिंग्टनची ‘स्वप्नवत विकेट’
भारताचा अष्टपैलू फिरकीपटू वॉशिंग्टनने नावाप्रमाणेच एकदम सुंदर गोलंदाजी केली आहे. सुंदरने मैदानावर जम बसवलेल्या जो रूटला बाद करत ड्रीम विकेट मिळवली. सुंदरच्या 43 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रूट त्याचा सर्वात आवडता स्वीप शॉट खेळायला गेला. स्वीप शॉट खेळताना जो रूट गुडघ्यावर खाली बसला आणि फटका खेळायला गेला. पण सुंदरचा चेंडू खेळायला चुकला आणि विकेटवर जाऊन आदळला. चेंडू स्टम्पसवर आदळताच बेल्स हवेत विखुरल्या. रूटने मागे वळून स्टम्पकडे पाहिलं तर बेल्स विखुरल्या होत्या आणि हे दृश्य पाहताच रूटने डोळे बंद करून घेतले. जमिनीवर हात टेकत त्याने निराशा व्यक्त केली.