इंटर मिलान विजयी
उरावाच्या क्लब वर्ल्ड कपमधील आशा संपुष्टात
वृत्तसंस्था/ सिएटल, अमेरिका
क्लब वर्ल्ड कपमध्ये व्हॅलेंटाईन कार्बोनीने स्टॉपेज वेळेत गोल करून इंटर मिलानला उरावावर 2-1 असा विजय मिळवून दिला. त्यामुळे जपानी क्लबची गट फेरीतून पुढे जाण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. इंटर मिलानला 78 व्या मिनिटापर्यंत गोल करता आला नसला, तरी बहुतेक वेळ चेंडू त्याच्याकडे राहिला.
लौटारो मार्टिनेझने निकोलो बरेलाचा कॉर्नरवर पुरविलेला चेंडू बायसिकल कीक हाणून जाळ्यात टाकला. तर कार्बोनीचा गेम-विनर फ्रान्सिस्को एस्पोसिटोच्या मदतीने 14 मिनिटांनी नोंदविला गेला. इंटरने अनेक वेळा गोल करण्याचे प्रयत्न करताना जपानी संघापेक्षा 21 जास्त फटके गोल करण्याच्या उद्देशाने हाणले. त्यापूर्वी उरावाने 11 व्या मिनिटाला गोल करून त्यांच्या उत्साही चाहत्यांना आनंद दिला होता. हे चाहते या सामन्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाकुरो कानेकोने पुरविलेल्या चेंडूवर रायोमा वतानाबेने जपानी संघाचा गोल केला. यावेळी वतानाबे गोलक्षेत्रात एकटाच असल्याचे पाहून त्याला कानेकोने चेंडू दिला. उरावाला स्टॉपेज टाइमच्या शेवटच्या मिनिटाला बरोबरी साधण्याची संधी होती, परंतु गोलकीपर यान सोमरने लांब पल्ल्याच्या फ्री किकला क्रॉसबारवरून बाहेरची दिशा दाखविली. या विजयासह इंटर मिलानने गट ‘ई’मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. आता इटालियन क्लब बुधवारी अर्जेंटिनाच्या रिव्हर प्लेटशी, तर उरावा सीएफ मोंटेरीविऊद्ध खेळेल.
दरम्यान, बोऊसिया डॉर्टमंडने क्लब वर्ल्ड कपच्या गट टप्प्यात मामेलोडी सनडाऊनवर 4-3 असा विजय मिळवला. दोन्ही संघांना आणि टीक्युएल स्टेडियमवरील 14,006 प्रेक्षकांना उच्च तापमानामुळे त्रास होऊन त्यातून सुटका करण्यासाठी ब्रेक घेण्याची पाळी आली. 11 व्या मिनिटाला लुकास रिबेरो कोस्टाने सनडाऊनला आघाडी मिळवून दिल्यानंतर गोलरक्षकाने केलेल्या चुकीचा लाभ उठवत 16 व्या मिनिटाला फेलिक्स न्मेचाने डॉर्टमंडला बरोबरी साधून दिली.डॉर्टमंडने मध्यंतरापर्यंत त्यांची आघाडी 3-1 अशी वाढवताना 34 व्या मिनिटाला सेरहौ गुइरासीने आणि 45 व्या मिनिटाला जोबे बेलिंगहॅमने गोल केला. त्यानंतर 59 व्या मिनिटाला खुलिसो मुदाऊच्या स्वयंगोलने संघाला 4-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सनडाऊनने सलग दोन गोल केले.