यामाहा चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यास अटक
सांगली :
आष्टा, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आणि महापालिका परिसरातून यामाहा चोरणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यास पोलिसांनी बावची फाटा येथून अटक केली. त्याच्याकडून यामाहा कंपनीच्या आणि एकाच मॉडेलच्या सात लाख २० हजार किंमतीच्या १२ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. संकेत तानाजी ढगे (२१, रा. निंबोणी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली.
याबाबत अधिक माहिती अशी, मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातून दुचाकी चोरी जाण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. चोरट्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने स्वतंत्र पथक कार्यरत केले होते. पथकास पोलीस रेकॉर्डवरील असणारा गुन्हेगार संकेत ढगे हा विना नंबरची दुचाकी घेवून बावची परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयित दुचाकीवरुन फिरताना आढळल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे दुचाकीसंदर्भात विचारणा केली असता त्याने सदरची दुचाकी ही सांगलीतील शिवशंभो चौकातून चोरल्याची कबुली दिली. त्याने यापूर्वी चोरी केलेल्या दुचाकी त्याच्या बावची येथील मित्राच्या घरानजीक लावल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथे जावून पाहणी केली असता तेथे तीन दुचाकी आढळल्या.
संशयित संकेत ढगे याने अन्य सात दुचाकी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि डोंगरगाव या ठिकाणी ओळखीच्या व्यक्तीच्या घराजवळ लावल्याचे सांगितले. तेथूनही पोलिसांनी दुचाकी हस्तगत केल्या. संशयित संकेत याच्यावर आष्टा आणि मंगळवेढा पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत