मेक्सिकोमध्ये जेन झेडची तीव्र निदर्शने
महापौराच्या हत्येनंतर सरकारच्या विरोधात आक्रोश
वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी
अमेरिकेचा शेजारी देश मेक्सिकोमध्ये हजारो लोक सरकारच्या विरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. अध्यक्ष क्लाउडिया शिनबाम यांच्या सरकारच्या विरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार अणि सरकारी दडपशाहीच्या विरोधात राजधानी मेक्सिको सिटीमध्ये लोक रस्त्यांवर उतरले आहेत. मेक्सिकोच्या सिटीच्या रस्त्यांवर मोर्चांचे आयोजन केले जात असून याचे नेतृत्व जेन झेड करत आहेत, याला विरोधी पक्षांचे समर्थन प्राप्त आहे.
भ्रष्टाचार आणि हिंसक गुन्ह्यांसाठी शिक्षेपासून मुक्ती यासारख्या प्रणालीगत समस्यांमुळे त्रस्त आहोत अशी व्यथा जेन झेडने व्यक्त केली आहे. जेन झेड युवा समुहांनी मेक्सिको सिटीत एका विशाल मोर्चाचे आयोजन केले होते. याचा उद्देश मेक्सिकोतील एक महापौर कार्लोस मंजो यांच्या हत्येच्या विरोधात निदर्शने करणे होता. ड्रग्ज तस्करांनी महापौर मंजो यांची हत्या केली होती. कार्लोस मंजो हे ड्रग्ज तस्करांच्या विरोधात दीर्घकाळापासून मोहीम राबवत होते.
निदर्शकांमध्ये मोठ्या संख्येत युवांचा सहभाग असून त्यांना जेन झेड संबोधिले जात आहे. सरकार गुन्हेगारी रोखण्यास अपयशी ठरले असून अनेक हिंसक प्रकरणांमध्ये न्यायाची प्रक्रिया अत्यंत मंद किंवा जवळपास निष्क्रीय असल्याचा आरोप निदर्शक करत आहेत. महापौर कार्लोस मंजो यांच्या हत्येने मेक्सिकोत ड्रग्ज कार्टेल्सच्या विरोधात आक्रोश निर्माण झाला आहे. मंजो हे ड्रग्ज कार्टेल्स विरोधात उघडपणे आवाज उठवत होते, तसेच त्यांनी या गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. मंजो यांची हत्या ही सरकारच्या अपयशी धोरणांचे प्रतीक असल्याचे म्हणत जेन झेडने मोर्चाचे आवाहन केले होते.
तर अध्यक्ष शीनबाम यांनी या निदर्शनांना पूर्णपणे राजकीय ठरविले आहे. निदर्शनांमध्ये उजव्या विचारसरणीच्या पक्षांचा हात असून ते माझ्या सरकारला अस्थिर करू पाहत आहेत. बॉट्स (बनावट अकौंट्स)कडून हे ऑनलाइन अभियान चालविले जात असल्याचा दावा शीनबाम यांनी केला आहे. निदर्शनांदरम्यान काही भागांमध्ये जमावाला पांगविण्यासाठी मेक्सिकन पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. तर निदर्शकांनी नॅशनल पॅलेसबाहेरील सुरक्षाव्यवस्था भेदण्याचा प्रयत्न केला होता. नॅशनल पॅलेस हे अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आहे.